कोल्हापूरच्या मातीशी आणि संस्कृतीशी नाळ जोडलेल्या 'तुझ्यात जीव रंगला मालिका' फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे मालिकेतील कुस्तीमुळे महाराष्ट्रातील बंद पडलेल्या अनेक तालीम संस्था पुन्हा उभारी घेत आहेत. रुस्तम-ए-हिंद, डबल ‘महाराष्ट्र केसरी’ दादू दत्तात्रय चौगुले यांचे रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते ७३ वर्षाचे होते. महाराष्ट्रच्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने राणा दानेही दुःख व्यक्त केले आहे.
सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, आपल्या सगळ्यांचेच लाडके रुस्तमे हिंद, महान भारत केसरी, डबल महाराष्ट्र केसरी दादुमामा चौघुले ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो,आत्ताच कळलं की ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. खरं तर अजूनही विश्वास बसत नाहीये की ते आता आपल्यात नाहीयेत. त्यांच्यासोबतचा तो वज्रकेसरीचा सामना अजूनही तसाच स्पष्ट आहे डोळ्यांसमोर. सगळं आठवतंय मला, त्यांच्यासोबत काम करत असतानाचे सगळे अनुभव, त्यांनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या आठवणी सगळंच अगदी स्पष्ट आहे अजूनही नजरेसमोर.
महाराष्ट्राच्या या लाडक्या पैलवानाने, ज्याने भल्या भल्यांना आस्मान दाखवलं, त्यांच्या सोबतचा प्रत्येक क्षण बरच काही शिकवून जाणारा होता. तुझ्यात जीव रंगलाच्याच्या संपूर्ण टीम कडून त्यांना भावपूर्ण आदरांजली 🙏 तुम्ही नेहमीच स्मरणात आणि आमच्या आठवणीत रहाल मामा.