लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ही मालिका फक्त महाराष्ट्राच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. अभिनेता हार्दिक जोशीने तर राणा दा बनत अक्षरक्ष: धुमाकुळ घातला. हार्दिकने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत रसिकांना त्याचा प्रत्येक अंदाज भावत आहे. त्यामुळे अल्पावधीतच राणा दाने रसिकांची मनं जिंकली. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. टीआरपी रेटिंगमध्ये ही मालिका अव्वल असते. "कोल्हापूरची संस्कृती, रांगडी भाषा, कुस्ती परंपरा जपणारा आणि शेतकरी वारसा साणारा राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी हा मालिकेत एंट्री करण्यापूर्वी बॉलिवडूमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायचा. हार्दिक जोशी हा उत्तम डान्सर देखील आहे.
अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ ह्या सिनेमाच्या गाण्यात हार्दिक जोशीने साईड डान्सर म्हणून काम केले आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडून त्याने रितसर ट्रेनिंग देखील घेतले आहे. इतरांप्रमाणे हार्दिकला देखील संघर्ष काही चुकला नाही. त्यालाही उत्तम काम मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावे लागले आहे. हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये मनासारख्या भूमिका मिळत नसल्यामुळे हार्दिक मराठी मालिकांकडे वळला. त्यानंतर त्याला छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या. मात्र त्याला खरी लोकप्रियता, पैसा प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा ही केवळ तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळेच मिळाली आहेत.
राणादाची शरिरयष्टीवर अनेक तरूणी फिदा होतात. तो देखील फिटनेस फ्रिक अभिनेता आह. कधीच वर्कआऊट आणि डाएटकडे तो दुर्लक्ष करत नाही. राणाची भूमिका कुस्तीपटूची असल्यामुळे हार्दिकने १५ किलो वजन वाढवलं होतं तेच आता रणविजय गायकवाड या भूमिकेसाठी १५ दिवसांत ८ किलो वजन त्याच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली कमी केले. अर्थात या मेहनत व जिद्द यांचा मोलाचा वाटा आहे.
प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याने करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केलेला असतो. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर अनेक संकटं तसंच अडचणींवर मात करत ती व्यक्ती यशशिखरावर पोहोचते. त्यामुळंच हार्दिक जोशीसाठी देखील करिअरच्या सुरुवातीचा काळ आठवणीत ठेवण्यासारखा आहे.