प्रसिद्ध लेखक हरी नरके यांचं बुधवारी (९ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांची लेक प्रसिद्ध अभिनेत्री प्रमिती नरके हिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रमितीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.सोबतच असं एक वक्तव्य केलं ज्यामुळे अनेकजण थक्क झाले.
"लहानपणापासून त्याने मला ए बाबा असं म्हणायची सवय लावली होती अहो-जाहो नाही. बाबा नोकरी करत असताना दौरे करायचा, कार्यक्रम करायचा आणि मला तो जवळजवळ ४ महिन्यांनी भेटायचा. मला त्याने वाचनाची सवय लावली होती. जी त्याला होती तीच सवय त्याने मला लावली. त्याने ती माझ्यात रुजवली. तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला. मला जे करायचं ते करु दिलं. मी ललित केंद्रात प्रवेश घेतला तेव्हा आरक्षण वापरायचं नाही अशी सक्त ताकीद त्याने दिली होती. त्यामुळे मी न वापरता तिथे प्रवेश मिळवला. मला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं म्हटल्यावर प्रथम तो घाबरला होता पण त्याने मला कधीच तसं जाणवू दिलं नाही. तो आईला हे सगळं सांगायचा", असं प्रमिती म्हणाली.
पुढे ती म्हणते, "बाबांचे अनेक विरोधक होते. त्यामुळे आता या घटनेचा त्यांना आनंदच झाला असेल. मी बघतेय सोशल मीडियावर वगैरे तर त्या सगळ्यांना मला फक्त इतकंच सांगायचंय की, आयुष्यभर त्या व्यक्तीने फक्त स्वत:च्या विचारांनीच तुमच्या विचारांचं खंडन केलं. आज तुमच्यात धमक असेल तर तुमच्या विचारांनी त्यांचं खंडन करा. आणि ती धमक मिळवलीत. तर टीका करा. टीका तर करूच शकत नाहीत कारण ती करण्यासाठी काहीतरी वैचारिक वारसा लागतो. फक्त शिवीगाळ करणं किंवा आनंद व्यक्त करणं हा तुमचाच कमीपणा समोर आणतो. मात्र, या सगळ्यामुळे माझा बाबा अजून मोठा होतोय. मी स्वत:ला खूप नशीबवान मानते की मी हरी नरेंची मुलगी आहे. मी समाजकार्याच्या क्षेत्रात नाहीये. पण, त्यांचा वारसा मी माझ्या पद्धतीने नक्कीच पुढे नेत राहिन."