Join us

‘कर्णसंगिनी’ मध्ये या भूमिकेत दिसणार हर्षाली मल्होत्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 4:25 PM

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील लहान मुलीच्या भूमिकेतील हर्षाली मल्होत्राने सर्वांची मने जिंकून घेतली होती. आता ‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत ती झळकणार आहे.

महाभारताच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या 'कर्णसंगिनी' या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ही मालिका कर्ण आणि त्याची पत्नी ऊरूवी यांच्या आयुष्यावर बेतलेली आहे. महाभारतातील युद्ध आणि राजकरणाबद्दल आपणा सर्वांनाच ठाऊक आहे, पण या मालिकेत मात्र महाभारतातील दुर्दैवी नायक कर्ण, ऊरूवी आणि अर्जुन यांची कथा अगदी नव्या दृष्टीकोनातून सादर केली जाणार आहे. या मालिकेच्या स्टार कास्टमध्ये आता प्रेक्षकांच्या एका लाडक्या बालकलाकाराचा समावेश झाला आहे.

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील लहान मुलीच्या भूमिकेतील हर्षाली मल्होत्राने सर्वांची मने जिंकून घेतली होती. आता ‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत लहानपणीच्या राजकन्या उरुवीच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी हर्षालीकडे विचारणा केल्याचे समजत आहे.

कविता काणे यांच्या ‘कर्णाज वाईफ : द आऊटकास्ट क्वीन’ या पुस्तकावर ‘कर्णसंगिनी’ मालिका आधारित आहे. उरुवी ही क्षत्रिय राजकन्या तत्कालीन मूल्ये आणि प्रथा यांना आव्हान देत आपला पती म्हणून आपल्यापेक्षा कनिष्ठ जातीतील कर्णाची निवड करते, अशी या पुस्तकाची कथा आहे. निर्मात्यांनी तरुण उरुवीसाठी तेजस्वी प्रकाश हिची निवड केली असली, तरी त्यांना बालपणीची उरुवीही तितकीच गोड आणि लाघवी हवी होती. त्यामुळेच त्यांनी या भूमिकेसाठी हर्षाली मल्होत्राची निवड केली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार निर्मात्यांनी हर्षालीकडे या भूमिकेसाठी विचारणा केली असून सर्व काही सुरळीत पार पडले, तर हर्षाली लवकरच मालिकेच्या चित्रीकरणाला प्रारंभ करणार असल्याची चर्चा आहे.

'कर्णसंगिनी' या मालिकेची निर्मिती भव्य प्रमाणावर केली जाणार असून त्यातून त्या काळातील भव्यता दिसून येणार आहे. तसेच एकापेक्षा एक दर्जेदार कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, ही सुद्धा या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले, अशीम गुलाटी, किंशुक वैद्य, सयंतानी घोष यांसारखे कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असल्याची घोषणा मालिकेच्या टीमकडून करण्यात आलेली आहे. 

‘कर्णसंगिनी’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सुरू होणार आहे.

टॅग्स :कर्णसंगिनी