मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (hemangi kavi). उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी हेमांगी तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेही कायम चर्चेत येत असते. बऱ्याचदा कलाविश्वात घडणाऱ्या किंवा समाजात घडणाऱ्या घटनांवर ती उघडपणे भाष्य करत असते. अलिकडेच हेमांगीची 'बाई, बुब्स आणि ब्रा' ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. या पोस्टनंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. इतकंच नाही तर या पोस्टनंतर तिच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी तिला ट्रोल करतात. या ट्रोलिंगवर आता हेमांगीने भाष्य केलं आहे.
अलिकडेच हेमांगीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं. 'आपल्या संस्कृतीला एक बाई धक्का देत आहे', असं लोकांना वाटतं आणि त्यामुळे ते मला ट्रोल करतात असं हेमांगी म्हणाली. इतकंच नाही तर मला पाठिंबा देणारे ८० टक्के आहेत. तर, ट्रोल करणारे २० टक्के असल्याचंही तिने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तिची ही मुलाखत सुद्धा चर्चेत आली आहे.
नेमकं काय म्हणाली हेमांगी?
''बाई, बुब्स आणि ब्रा' या पोस्टनंतर मला ट्रोल करणाऱ्यांची संध्या प्रचंड वाढली. आपल्या संस्कृतीला एक बाई धक्का देतीये असं या मंडळींना वाटत आहे. रोजचं काम असल्याप्रमाणे ही मंडळी मला ट्रोल करतात. संस्कृतीसंदर्भात काहीही वक्तव्य केलं तरी ते दडपून टाकायचा प्रयत्न या मंडळींकडून केला जातो. मुळात या लोकांची संख्या फार कमी आहे. मला पाठिंबा देणारे ८० टक्के आणि ट्रोल करणारे २० असं हे गणित आहे त्यामुळे अशा लोकांना फारसं महत्त्व देणं मला योग्य वाटत नाही", असं हेमांगी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मुळात ट्रोलर्स मला घाबरतात. बाईच्या स्वातंत्र्याबद्दल बोलताना ट्रोलर्स मंडळी बिथरतात आणि हवा तसा मग हल्ला करतात. त्यानंतर मग माझी कोणत्याही विषयासंदर्भातली पोस्ट ट्रोल केली जाते. माझी इमेज कशी खराब होईल याचा ही मंडळी प्रयत्न करत असतात. पण, दुसरीकडे जेव्हा चाहते मला भेटतात त्यावेळी ते माझं कौतुक करतात. मी आधीपासूनच बोल्ड आणि बिनधास्त आहे हे फक्त आता दिसू लागलं आहे. आता सोशल मीडियामुळे हे लोकांसमोर येत आहे. व्यक्त होण्यासाठी मला पूर्वी माध्यम मिळालं नव्हतं. त्यामुळे मी जे वागायचे, बोलायचे ते कोणाला दिसत नव्हतं." दरम्यान, हेमांगी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मालिका, सिनेमा, नाटक, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.