प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरने त्रस्त आहे. अभिनेत्री तिच्या प्रकृतीचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते. काही काळापूर्वी अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिचे केस कापल्याची माहिती दिली होती. आता अभिनेत्रीने एक लेटेस्ट व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती टक्कल करताना दिसून येत आहे.
हिना कॅन्सरवर उपचार घेत आहे. यामध्ये केमोथेरपीच्या सत्रात केस गळायला लागतात. केसांना गळताना पाहणे खूपच निराशाजनक आणि तणावपूर्ण आहे. हिनाने तिचं मानसिक स्वास्थ मजबूत ठेवण्यासाठी टक्कल करण्याच निर्णय घेतला. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती ट्रिमरने मुंडण करताना दिसत आहे. एवढ्या कठीण परिस्थितीतही हिनाने दाखवलेली हिंमत पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.
हिनाने सर्व कॅन्सरग्रस्तांना मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यास सांगितलं आहे. हिना व्हिडीओमध्ये म्हणते, "माझ्या शारीरिक आरोग्याबाबत जे काही घडत आहे त्याबद्दल मी फार काही करू शकत नाही, परंतु ज्या गोष्टींवर माझे नियंत्रण आहे. ते मी निश्चितपणे ठीक करू शकते. जर तुमचे मानसिक आरोग्य चांगले असेल तर तुमचे शारीरिक आरोग्य 10 पटीने चांगले होते. मानसिक आरोग्य माझ्या हातात आहे. या प्रवासात मला शारीरिक त्रास होईल, पण मला मानसिकदृष्ट्या खंबीर राहायचे आहे आणि कोणत्याही प्रकारचा ताण घ्यायचा नाही".
हिना खानने तिच्या कॅन्सरची बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती. कॅन्सरचा सामना करण्यासाठी हिनाला सर्वजण धीर देत आहेत. कुटुंबासह हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालही तिच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. हिनासाठी हा काळ खूप कठीण आहे, पण की ज्या धैर्याने या कठीण प्रसंगाचा सामना करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. हसतमुख चेहरा आणि अतूट धैर्याने कर्करोगाचा सामना करणाऱ्या हिना खानने चाहत्यांसाठी एक आदर्श ठेवला आहे.