अभिनेता करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) 'दिल मिल गये' मालिकेमुळे ओळखला जातो. मालिकेत त्याने अरमान ही भूमिका साकारली होती. अरमान-रिद्धिमाीची केमिस्ट्री आजही तरुणांच्या आवडीची आहे. नंतर करणने मालिका, हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. नुकताच तो हृतिक रोशन-दीपिका पदुकोणसोबत 'फायटर' सिनेमात दिसला होता. आता करण टीव्हीवर पुन्हा कमबॅक करत आहे.
टाईम्स नाऊ रिपोर्टनुसार, करण सिंह ग्रोवर पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. 'तुम से तुम तक' मालिकेतून तो कमबॅक करत आहे. LSD प्रोजक्शन मालिकेची निर्मिती करत आहे. शोचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. करणला शोसाठी ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. ही मालिका 'तुला पाहते रे' या मराठी मालिकेचा रिमेक आहे अशीही चर्चा रंगली आहे. 'तुला पाहते रे' मध्ये सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची भूमिका होती. २०१८ ला ही मालिका आली होती जी एक वर्ष चालली.
मालिकेच्या कथानकानुसार करण सिंह ग्रोवर या मालिकेत १३ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसेल. अभिनेत्री हेली शाह यामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. हेली २९ वर्षांची असून करण सिंह ग्रोवर ४२ वर्षांचा आहे. दोघांमध्ये १३ वर्षांचं अंतर आहे. त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी आता चाहते उत्सुक आहेत. अद्याप मालिकेच्या फर्स्ट लूकमध्ये दोघांचेही चेहरे रिव्हील करण्यात आलेले नाहीत.
करण सिंह ग्रोवर सिनेमांमध्ये येण्यापूर्वी लोकप्रिय टीव्ही अभिनेता होता. एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' मध्ये तो रिषभ बजाजच्या भूमिकेत दिसला होता. १ वर्ष त्याने ही मालिका केली. नंतर तो कुबूल है 2.0 मध्ये दिसला. तर हेली शाहने 'इश्क मे मरजावाँ' मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे.