Join us

"बायका लाटणे घेऊन मारायला यायच्या", 'पवित्र रिश्ता'मधील खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:02 IST

छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका येत असतात परंतु त्यातील काही मोजक्याच मालिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात.

Pankaj Vishnu: छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका येत असतात पण त्यातील काही मोजक्याच मालिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात. 'पवित्र रिश्ता' (pavitra Rishta) ही मालिका त्यामधील एक आहे. झी टीव्ही वाहिनीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. २००९ मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेने अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत तसेच अंकिता लोखंडे, उषा नाडकर्णी, सविता प्रभूणे शिवाय प्रिया मराठे यांसारख्या कलाकारांची तगडी स्टारकास्ट मालिकेत पाहायला मिळाली. अंकिता लोखंडेने मालिकेत अर्चना ही भूमिका साकारली होती, तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मानव नावाची भूमिका केली होती. एकता कपूरची निर्मिती असलेल्या या मालिकेने खूप लोकप्रियता मिळवली. परंतु या सगळ्यात भाव खाऊन गेला तो खलनायकाची भूमिका साकारलेला अभिनेता पंकज विष्णू (Pankaj Vishnu). नुकत्याच  दिलेल्या एका मुलाखती पंकजने 'पवित्र रिश्ता' मालिकेतील त्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

अलिकडेच पंकज विष्णूने 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने 'पवित्र रिश्ता'मधील खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर त्याला आलेला अनुभव शेअर केला आहे. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, "पवित्र रिश्ता ही मालिका जेव्हा सुरू झाली तेव्हा मला असं वाटायचं की आपण या मालिकेचा भाग व्हावं. कारण ही एक मराठी बॅकग्राउंडची स्टोरी होती. 'चार दिवस सासूचे' या मालिकेप्रमाणे ही मालिका चालली. अतिशय साध्या वातावरणातील कथा, चाळीत घडणारी कथा हिरोईन चाळीत राहणारी आणि हिरो मॅकेनिक असं सगळं होतं. तेव्हा माझी 'अवघाचि संसार' मालिका नुकतीच संपली होती आणि मग लगेचच मला या मालिकेत काम मिळालं."

पुढे अभिनेत्याने सांगितलं, "'पवित्र रिश्ता' मालिकेत अजित लोखंडे नावाचं माझं पात्र होतं. ते कॅरेक्टर खूपच प्रसिद्ध झालं. मालिकेत तो व्हिलन होता. मानवच्या विरुद्ध म्हणजेच सुशांतच्या विरोधात त्याला काम करायचं होतं. पण, तेव्हा अक्षरश: बायका मला लाटणं घेऊन मारायला यायच्या. एकदा तर लोखंडवाला कॉम्पलेक्समधून जात होतो. समोरून मुली येत असल्या तर त्या रस्ता क्रॉस करून बाजुला व्हायच्या. अरे! हा अजित आहे, पळा... असं त्या म्हणायच्या. अशी या कॅरेक्टरची दहशत होती."

टॅग्स :टेलिव्हिजनअंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूतसेलिब्रिटी