अनेक कलाकार टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहचतात. काही कलाकार अभिनयाच्या जोरावर टीव्ही ते बॉलिवूड असाही प्रवास करतात. यामध्ये मौनी रॉय, अंकिता लोखंडे असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी लांबचा पल्ला गाठला. यातलाच एक अभिनेता म्हणजे हितेन तेजवानी. हा २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता आहे. 'घर एक मंदिर', 'कुटुंब' आणि 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकांमध्ये हितेन तेजवानीनं साकारलेल्या भूमिका गाजल्या. तर त्यानं काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकतंच अभिनेत्यानं एका मुलाखतीमध्ये टीव्ही कलाकार वर्षाला १ कोटी रुपये कमवू शकतो, असं सांगितलं.
टीव्ही लाकारांचं मानधनही दिवसाला काही लाखांमध्ये असतं. अनेक कलाकारांचं आयुष्य टीव्ही मालिकांमुळं बदललं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखीत हितेननं टेलिव्हिजनवर भाष्य केलं. तो म्हणाला, 'जर आपण ३० दिवसांच्या शूटिंगसाठी किमान ७ लाख रुपये मोजले तर ते एका वर्षात ८४ लाख रुपये होते. आणि मग जर काही जाहिरात किंवा कार्यक्रम असेल तर ते तुम्हाला थोडे जास्त पैसे देतील. म्हणजे हे एकूण १ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते".
पुढे तो म्हणाला, "टीव्ही कलाकारांच्या कामाच्या वेळा, दिवस हे ठरलेले नसतात. सलग दोन दोन दिवस शूटिंग मी केलं आहे. ब्रेक न घेता पूर्ण एक महिनाही काम केलं होतं. २४ तास, ४८ तास शूटिंग असायचं. मी १० मिनीटांची सेटवर डुलकी काढायचे आणि पुन्हा शूटिंग. एक सीन संपला की, कपडे बदला आणि लगेच दुसरा सीन".
दरम्यान, हितेनपुर्वी अभिनेता विक्रांत मेसीनेदेखील टेलिव्हिजन सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तो महिन्याला ३५ लाख रुपये कमवत होता, असं सांगितलं होतं. विक्रांत म्हणाला होता की, "टीव्हीमध्ये काम करताना मी खूप पैसे कमवले. मी वयाच्या २४ व्या वर्षी माझे पहिले घर खरेदी केले, मी दरमहा ३५ लाख रुपये कमवत होतो".