जुई गडकरी
माझं मोठं एकत्र कुटुंब आहे आणि दरवर्षी मी होळी व रंगपंचमी हे सण माझ्या कुटुंबासोबत साजरे करते. या वर्षी देखील मी 'वर्तुळ' मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून होळी माझ्या कुटुंबासोबतच साजरी करणार आहे. माझी सर्व लोकांना एकच विनंती आहे कि प्राण्यांना रंगांपासून दूर ठेवा. त्यांच्यावर फुगे मारू नका. त्यांना खूप त्रास होतो. सेफ होळी साजरी करा.
विवेक सांगळे
माझ्या कडून आम्ही दोघी आणि झी युवाच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळी म्हणजे गरमागरम पुरणपोळी, रंग आणि ढोलकीच्या तालावर आयना का बायना गाण्यावर धरलेला ठेका. मी अशीच होळी साजरी करतो. यावर्षीदेखील मी 'आम्ही दोघी' मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून होळी साजरी करणार आहे. मी माझ्या चाहत्यांना एक आवाहन करू इच्छितो कि या होळी पेटवण्यासाठी कमीत कमी लाकडाचा वापर करा. लाकडाऐवजी सुका कचरा, किंवा सुका पाला पाचोळा याचा वापर करा तसेच रंग खेळण्यासाठी ऑरगॅनिक कलर्सचा वापर करा जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही.
मी लहानपणी माझ्या मित्रपरिवारासोबत खूप रंग खेळायचो, धमाल करायचो. पण महाराष्ट्रातील पाण्याचा तुटवडा बघता मी गेल्या काही वर्षांपासून रंगपंचमी साजरी करणं बंद केलं आहे. अनेक ठिकाणी पाणी कपात आहे, त्यामुळे सणासुदीच्या निमित्ताने पाणी वाया घालवणं मला पटत नाही. होळीची एक गोष्ट मला खूप आवडते कि आपण आपल्या आजूबाजूची नकारात्मकता, निराशा हि सर्व त्या होळीमध्ये जाळून टाकतो आणि एका नव्या उमेदीने पुन्हा सुरुवात करतो.मी चाहत्यांना देखील हेच सांगू इच्छितो रंग उधळा, प्रेम वाटा आणि आनंदाने सण साजरा करा. कोणालाही त्रास होईल असं काही करू नका.
शिवानी बावकर
होळी व रंगपंचमी हे माझे आवडते सण आहेत, पण सध्या लागीरं झालं जी मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मला हा सण साजरा करता येणार नाही. गेल्यावर्षी आम्ही लागीरं झालं जी मालिकेतहोळी साजरी केली. सलग ३ दिवस आम्ही शूट करत होतो. आम्ही ३ दिवसात इतके रंग खेळलो कि चाहते आमच्यासोबत फोटो काढण्यासाठी सेटवर येत होते पण त्यांनी आम्हाला ओळखलंसुद्धा नाही.एक चाहता माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी आला आणि मी त्यांच्या बाजूलाच उभी होती पण तरीही ते विचारात होते शीतल कुठे आहे. हा होळीचा मजेशीर किस्सा मी कधीच विसरू नाही शकत.