टीव्हीवरच्या मालिका हा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय. मराठी मालिकाही घराघरात आवडीने पाहिल्या जातात. वेगवेगळ्या वाहिन्यावर सध्या नव्या नव्या मालिका सुरू होत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी नव्या विषयाला वाहिलेल्या मालिका आणण्याची नुसती चढाओढ लागली आहे. पण जुन्या मालिकांची बातच काही और. अनेक जुन्या मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशात दोन गाजलेल्या दोन मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. होय, झी मराठी ही वाहिनी दोन अतिशय गाजलेल्या मालिका पुन्हा घेऊन येतेय.
झी मराठी वाहिनीचा टीआरपीचा गेल्या काही दिवसांपासून ओहोटी लागली आहे. टीआरपी वाढावा यासाठी गेल्या काळात अनेक नव्या मालिका झी मराठीवर सुरू झाल्यात. पण टीआरपीची गाडी म्हणावी तशी रूळावर आलेली नाही. त्यामुळे आता वाहिनीने जुने लोकप्रिय शो पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव दोन जुन्या मालिका सुरू होणार असल्याचं झी मराठीने म्हटलं आहे. पण यामागे घसरलेला टीआरपी हे खरं कारण असल्याचं मानलं जात आहे. त्यानुसार, ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या दोन मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहेत. येत्या १३ फेब्रुवारी २०२३ पासून ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या दोन मालिका पुन्हा प्रक्षेपित केल्या जाणार आहे. संध्याकाळी ४ आणि ५ वाजता या वेळात या दोन मालिका प्रसारित होणार आहे.
‘होणार सून मी या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या दोन्ही मालिका प्रचंड गाजल्या होत्या. ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका तर तुफान लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील श्री आणि जान्हवीला अद्यापही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. या मालिकेत जान्हवीच्या भूमिकेत तेजश्री प्रधान होती. तर श्रीची भूमिका शशांक केतकरने साकारली होती. या मुख्य व्यक्तिरेखांसोबतच पिंट्या, ताई मावशी या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या होत्या.