आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळाली. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, असा आपला बाजिंदा नायक राया आहे.
मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी कृष्णा यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे.
राया आणि कृष्णा एकमेकांना आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराच्या रूपात बघत नाहीयेत, पण रायाच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे त्याची पहिली बायको ही अल्पायुषी असेल असं भाकीत गुरुजींनी केलं. त्यामुळे गुली मावशी राया आणि कृष्णाचं लग्न लावण्यासाठी मामाला भरीस पाडते आणि दोघांच लग्न होतं.
राया आणि कृष्णाच्या गाडीला अपघात झाल्यावर, बेशुद्ध कृष्णाला राया स्वतः श्वास देऊन वाचवतो. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि राया कृष्णाचं घर जप्तीपासून वाचवतो आणि कृष्णाला घेऊन आपल्या घरी येतो. त्याचवेळी तिथून निघण्याचा कृष्णा प्रयत्न करते, पण सासरच्यांच्या आग्रहापोटी तिला तिथे रहावं लागतं. त्यातच भाऊसाहेब आणि फुई, राया आणि कृष्णाच्या हनिमूनचा प्लॅन आखतात. राया आणि कृष्णा कोकणात एका ठिकाणी हनिमूनसाठी रवाना होतात.या सर्व गोष्टींमुळे नकळत का होईना दोघांमधील नवरा बायकोचं नातं खुलताना दिसतंय, राया आणि कृष्णामधील दुरावा अखेर संपून प्रेमाचं नातं बहरेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.