गेल्या कित्येक वर्षापासून 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला असून सगळ्यांचं अविरत मनोरंजन करत आहे. लोकप्रिय शोच्या यादीत या शोचे नाव गणले जाते. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर लोकांच्या घरातघरात पोहोचले. या मालिकेतील त्यांचे सूत्रसंचालन लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात भावोजी म्हणूनच ओळखले जाते. आदेश चित्रीकरणानिमित्त लोकांच्या घरी गेल्यावर त्यांच्या मधील एक होऊन जातात. मी एक सेलेब्रिटी आहे याचा आव ते कधीच आणत नाही. त्यामुळे त्यांची हीच गोष्ट सर्वसामान्य लोकांना फार आवडते.
माहेर कितीही आवडलं तरी आपण माहेरी कायम राहू शकत नाही. माहेरवाशिणीला आपली पाऊलं सासरी परत आणावीच लागतात म्हणूनच होम मिनिस्टर आपलं नवं पर्व आता सासरी करणार आहेत. सासरची वाट कितीही गोड असली तरी तिथे नाजूक सुया आपल्या पायांना टोचतातच कारण सासर म्हणजे जबाबदारी, सासर म्हणजे दडपण, सासर म्हणजे कर्तव्य. पण या सगळ्या भावनांना मनातून कितीही वाटलं तरी कधी मोकळी वाट मिळत नाही.
आपण 'होम मिनिस्टर'च्या नव्या सीजन मधून याच कडू गोड आठवणींची वाट मोकळी करून देणार आहोत. वहिनी, सासू, जाऊ, नणंद एकाच घरात नांदणाऱ्या या माऊली पैठणीचा मान मिळवण्यासाठी खेळातून आणि गप्पा मधून एकमेकांना सामोऱ्या जातील.