Join us

 कुछ तो गडबड है दया ! कशी झाली या सुपरहिट डायलॉगची निर्मिती तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 3:49 PM

कुछ तो गडबड है दया हा केवळ डायलॉग नाही तर आज तो CID मालिकेची ओळख बनला. पण या कडक डायलॉगचा जन्म कसा झाला, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

ठळक मुद्देअभिनेते शिवाजी साटम यांनी ‘सीआयडी’मध्ये एसीपी प्रदुम्नची भूमिका साकारली होती.

सीआयडी’ (CID) या मालिकेचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारताच्या छोट्या पडद्यावरची दीर्घकाळ प्रसारित होणारी मालिका म्हणून ‘सीआयडी’ या मालिकेचा उल्लेख केला जातो. या मालिकेतच्या प्रत्येक एपिसोडमध्ये एक डायलॉग तुम्ही नक्की ऐकला असेन. होय, कुछ तो गडबड है दया... हाच तो डायलॉग. हा केवळ डायलॉग नाही तर आज तो या मालिकेची ओळख बनला. पण या कडक डायलॉगचा जन्म कसा झाला, हे तुम्हाला ठाऊक आहे का? तर दिग्दर्शकाच्या तंद्रीतून. होय, दिग्दर्शकाची तंद्री लागली आणि ‘सीआयडी’ला ‘कुछ तो गडबड है दया’ हा लोकप्रिय डायलॉग मिळाला.

अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी ‘सीआयडी’मध्ये एसीपी प्रदुम्नची  (ACP Pradyuman) भूमिका साकारली होती. त्यांचा तोंडचे ‘कुछ तो गडबड है दया’ आणि ‘दया दरवाजा तोड दो’ हे दोन संवाद प्रचंड लोकप्रिय झाले होते. ऐकून आश्चर्य वाटेल पण यापैकी ‘कुछ तो गडबड है दया’ हा डायलॉग मूळ स्क्रिप्टचा भागच नव्हता. शिवाय,‘कुछ तो गडबड है दया’ म्हणताना विशिष्ट शैलीत हात हलवण्याची पद्धतही अचानक ठरली होती.त्याचं झालं असं की, एकदा शोचे निर्माता दिग्दर्शक बी.पी. सिंग आणि शिवाजी साटम यांच्या गप्पा सुरू होत्या.

गप्पा रंगात आल्या असतानाच अचानक शिवाजी साटम एक क्षण गोंधळले. कारण काय तर बीपी आपल्याकडे एकटक बघत असल्याचे त्यांंनी अचानक हेरले होते. साहजिकच असे एकटक काय बघत आहात? असा प्रश्न शिवाजींनी बीपींना केला. यावर बीपींचे उत्तर ऐकून शिवाजी साटमही क्षणभर विचारात पडले. तू बोलताना हाताची एका विशिष्ट पद्धतीने हालचाल करतो. एसीपी प्रद्युम्नच्या भूमिकेसाठी याचा वापर करता येईल, असे मला वाटतेय. तुला काय वाटतं? असे बीपी शिवाजींना म्हणाले.

शिवाजींनी लगेच होकार दिला. पण  हाताची ही हालचाल मालिकेत वापरली तर त्यासोबत एक कडक संवादही हवा होता. म्हणजेच, संवाद आणि हाताची हालचाल याचा मेळ जमून यायला हवा होता. मग त्यावर दोघांची चर्चा सुरू झाली आणि बोलता बोलता, अनेक संवादावर चर्चा करता करता ‘कुछ तो गडबड है दया’  हा संवाद फायनल झाला. पुढे हीच स्टाईल आणि हाच संवाद एसीपी प्रद्युम्न यांची ओळख बनली. 

टॅग्स :शिवाजी साटमसीआयडी