Join us

पैठणी नेसून ऑडिशनला गेले, अन्...; 'तारक मेहता...'मधील 'माधवी भिडे'ची भूमिका कशी मिळाली? सोनालिका जोशींनी सांगितला किस्सा

By देवेंद्र जाधव | Updated: April 2, 2025 18:42 IST

माधवी भिडेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीला ही भूमिका कशी मिळाली याची कहाणी खूप खास आहे. तुम्हीही वाचा

'तारक मेहता का उलटा चष्मा' (tarak mehta ka ooltah chashmah) मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. मालिकेतील अशीच एक गाजलेली व्यक्तिरेखा माधली भिडे. मालिकेतील आत्माराम आणि माधवी भिडे हे मराठमोठं कपलने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेमुळे अभिनेत्री सोनालिका जोशीला (sonalika joshi) अमाप लोकप्रियता मिळाली. परंतु 'तारक मेहता..'मधील ही भूमिका सोनालिकाला मिळाली कशी, याचा रंजक किस्सा सोनालिका जोशीने एका मुलाखतीत सांगितला आहे.

अशी मिळाली सोनालिकाला तारक मेहता.. मालिका

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सोनालिकाने सांगितलं की, "शैलेश दातारमुळे मला तारक मेहता... मालिका मिळाली. कारण तो तारक मेहता..च्या ऑडिशनला गेला होता. शैलेशचं आधीच एका हिंदी इंडस्ट्रीत कोणाशीतरी बोलणं झालं होतं. त्यामुळे शैलेशच्या तारखा जुळत नव्हत्या. तारक मेहता.. सुद्धा डेली सोप असल्याने तिकडची अॅडजस्ट करायला तयार नव्हते. त्यामुळे शैलेशला जमत नव्हतं. पण 'मी ज्या कॅरेक्टरच्या ऑडिशनला गेला होतो त्याच्या बायकोची भूमिका आहे, तर तू ऑडिशनला जा', असं तो मला म्हणाला."

"मला त्यावेळी मला लहान मुलगी होती. ती फक्त ४ वर्षांची होती. मुलीला घरी ठेऊन जायचं म्हणून मी अनेकदा ऑडिशन टाळायचे. त्यावेळी गाडी, ड्रायव्हर काही नव्हतं. आमची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या ठीकठाक होती."

पैठणी नेसून ऑडिशनला गेले अन्...

सोनालिका मुलाखतीत पुढे म्हणाली की, "शैलेशने सुचवलं होतं आणि कांदिवलीतच ऑडिशन होती त्यामुळे जाऊया, असं मला आतून वाटत होतं. हिंदी मालिका असली तरी मराठी कॅरेक्टर आहे, हे त्याने मला आधीच सांगितलं असतं. मग मी शेजाऱ्यांना आर्याला (मुलगी) तासभर सांभाळायची विनंती केली आणि मी ऑडिशनला गेले.  त्यावेळी मला कशी बुद्धी झाली माहित नाही पण मी पैठणी नेसून गेले. नॉर्मल साडी सुद्धा घालून गेले असते पण पैठणी नेसणं नशीबात होतं."

"मालिकेचे निर्माते सुदैवाने त्यावेळी तिथे होते. दिग्दर्शक गुजराती असले तरी त्यांना मराठी माहित होतं. ते मला पाहून खूश झाले. निर्मात्यांनी मला बघितलं त्यावेळी त्यांच्या डोक्यात जी कॅरेक्टरची इमेज होती, ती मला पाहून त्यांना प्रत्यक्षात दिसली. पैठणी, महाराष्ट्रीयन लूक पाहून ते निर्माते खूशच झाले. त्यांनी मी कुठे राहते, असं मला विचारलं. मी कांदिवली सांगितलं. हे ऐकताच त्यांना आणखी आनंद झाला. 'तुला बरं आहे इथेच शूट होणार तुझंं असं म्हणत', त्यांनी माझी निवड केली. इतक्या सहज माझं मालिकेसाठी सिलेक्शन झालं."

"शैलेशने सुचवलंय तर ट्राय करायला हरकत नाही, असं माझ्या मनात आलं. त्यावेळी नशीब मला ती बुद्धी सुचली की. मी जर त्यादिवशी ती ऑडिशन मिस केली असती जशा मी त्याआधीच्या इतर ऑडिशन टाळल्या होत्या तर.. देव आहे कुठेतरी. मी आजपर्यंत जी कामं केली नाही ती स्वतःच्या बळावर. मला इथे मार्गदर्शन करणारा कोणी नाही, गॉडफादर कोणी नाही." अशाप्रकारे सोनालिकाने किस्सा सांगितला.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मामंदार चांदवडकरटेलिव्हिजन