सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कॅमेऱ्याच्या मागे किमया साधत चांगली कलाकृती रसिकांसमोर आणली आहे. मात्र आता ते कॅमेऱ्यासमोर सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती या शोचं सूत्रसंचालन ते करत आहेत आणि या शोला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कोण बनेगा करोडपती या यंदाच्या सीझनसाठी नागराज मंजुळे यांना दोन कोटी रुपये मानधन दिले आहे आणि हा सीझन जवळपास ४५ भागांचा असणार आहे. या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कोण बनेगा करोडपती हा शो हिंदीतही असून मराठीपेक्षा हिंदीचं बजेट जास्त असते. त्यामुळे सूत्रसंचालकाच्या बजेटमध्ये देखील मोठी तफावत असते. यासोबतच या शोमधील स्पर्धक जिंकल्यावर मिळणाऱ्या रक्कमेतही मोठा फरक आहे. कौन बनेगा करोडपती शोमध्ये जिंकलेल्या स्पर्धकाला ७ कोटी दिले जातात. तर कोण होणार करोडपतीमधील विनरला एक कोटींचा धनादेश घरी घेऊन जाता येतो.
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मुख्य भूमिकेत बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन दिसणार आहे. अमिताभ यांचा हा चित्रपट फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.‘झुंड’ हा चित्रपट भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून प्रोड्यूस करत आहेत.
हा नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या पहिल्या चित्रपटात महानायक अमिताभ दिसणार आहेत. साहजिकचं त्यांच्यासाठीचं नव्हे तर तमाम मराठीजनांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.