हृता दुर्गुळे हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात माहीत आहे. हृता ने आजवर दोन सुपरहिट मालिका दिल्या आहेत. पहिली मालिका "दुर्वा" व दुसरी लोकप्रिय मालिका 'फुलपाखरू' जी सध्या झी युवावर सुरू आहे. त्याचबरोबर सध्या रंगभूमीवर गाजत असलेलं एक वेगळ्या विषयावरील लोकप्रिय पारितोषिक पात्र नाटक म्हणजेच ' दादा एक गुड न्यूज आहे', हे काम ती सध्या करत आहे . हृता ची लोकप्रियता सोशल मीडियावर सुद्धा तुडुंब आहे. इन्स्टाग्रामवर तिला 13 लाख हुन जास्त तरुण तरुणी फॉलो करतात. मराठी टीव्ही मालिकांमधली ती पहिली कलाकार आहे जिचे सोशल प्लॅटफॉर्म वर एवढे प्रेक्षक वेडे आहेत. त्यामळे सध्या हृता काम घेण्याबाबत खूपच चोखंदळ आहे.
स्ट्रॉबेरी शेक ही एक २० मिनिटांची शॉर्ट फिल्म असून शोनील यल्लत्तीकर ह्याने ही लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे . 'स्ट्रॉबेरी शेक' या शॉर्टफिल्मचा मुख्य गाभा हा , आजची तरुण पिढी त्यांचे आपल्या पालकांबरोबरचे नाते आणि आजच्या पालकांचे आपल्या पाल्याबरोबरचे नाते यावर महत्वपूर्ण भाष्य करते .या शॉर्टफिल्म मध्ये वाढत्या वयाच्या चिऊ या १९ वर्षाच्या व्यक्तिरेखेची भूमिका हृताने अतिशय ताकदीने वठवली आहे . आजच्या पिढीची खरी मानसिकता आणि त्यावर आजच्या पिढीच्या पालकांचे विचार अतिशय वेगळ्या पण खुमासदार पद्धतीने स्ट्रॉबेरी शेक मध्ये दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. चिऊ हे पात्र आजच्या काळातील प्रत्येक घरातीतील त्या मुलीचे आहे जीला तिचे निर्णय स्वतः घेण्याची आणि तो निर्णय सांभाळण्याची ताकद आहे .
सध्या हृताला शॉर्टफिल्म्स, नाटक, सिनेमा, वेबसिरीज आणि मालिका इथून ऑफर्स येत आहेत.चिऊची भूमिका स्वीकारण्याबद्दल तिने सांगितले की "स्ट्रॉबेरी शेक" मधलं चिऊ हे कॅरेक्टर करताना खूप मजा आली, शोनील बरोबर मी पहिल्यांदाच काम करतेय आणि तो खूप उत्तम दिग्दर्शक आहे. ही २० मिनिटांची शॉर्ट फिल्म मुलगी आणि तिचे बाबा या दोघांच्या नाते संबंधांवर आहे.
माझ्या बाबांचा रोल ज्यांनी केलाय त्यांच्याबद्दल मला भरपूर बोलायचं आहे पण माझ्या प्रमाणे तुम्हीही त्यांच्या कामाच्या प्रेमात आहात तेव्हा ते कोण आहेत हे लवकरच तुम्हाला कळेल. एवढंच सांगीन ते माझे बाबा होते म्हणूनच मी सुद्धा चिऊ हे कॅरेक्टर करू शकले. चिऊ हे कॅरेक्टर आजच्या पिढीतील असंख्य मोकळ्या विचारसरणीच्या मुलींचं प्रतिनिधित्व करते. आताची पिढी त्यांचे निर्णय स्वतः घेतात पण त्याच बरोबर त्यांचे स्वतःच्या पालकांबरोबरचे नाते सुद्धा महत्वाचे आहे, हे कळते. आपल्या घरातील वाढत्या वयाच्या प्रत्येक चिऊची गोष्ट आणि अशावेळी बाबा आणि मुलगी हे नाते कसे असावे हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या "स्ट्रॉबेरी शेक" द्वारे करण्याचा प्रयत्न करत आहोत.