आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधीतरी हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा किंवा आपल्या कुटुंबातील हॉस्पीटलाईझ्ड व्यक्तीची काळजी घेण्याचा प्रसंग येऊन गेलेला असतो. आजारपण म्हटलं की घरात धावपळीला सुरुवात होते जाते. सर्व कुटुंबीय आजारी माणसाच्या सेवेत व्यस्त असतात. त्यातच जर आजारी व्यक्तीला जर हॉस्पीटलमध्ये दाखल करायची वेळ आली तर विचारायलाच नको. पेशंटसाठी खास जेवण बनवणे, सर्व औषधगोळ्या त्याला वेळेवर देणे ही कामे करावी लागतात.
पेशंटच्या कोणीतरी सतत जवळ राहून त्याला काय हवे नको ते बघावे लागते. या सर्वामध्ये आपला संयम सुटू न देता पेशंटलाही आधार द्यावा लागतो. पेशंटला भेटायला येणाऱ्या वेगवेगळ्या नातेवाईकांचा सामना करावा लागतो. अनेकजण नको असताना फुकटचे सल्ले देतात, तर काही नातेवाईक आजारपणाचे भयंकर किस्से सांगून घाबरवतात. एकंदरच सगळा मनस्ताप होतो. डॉक्टरांनी सांगितलेल्या पेशंटच्या वेगवेगळ्या टेस्ट्स, गोळ्या-औषधे मॅनेज करणे, त्यांचे रिपोर्ट्स समजावून घेणे यासाठी बरेच कष्ट वेचावे लागतात.
डॉक्टर, नर्स पासून ते वार्डबॉय पर्यंतचे वेगवेगळे स्वभाव समजून घेऊन त्यांच्याशी वागावे लागते. आपल्या पेशंटच्या उपचारात जराही कमतरता होऊ नये म्हणून त्यांच्याशी प्रेमाने वागावे लागते. सगळे घरच आजारी आहे की काय असे वाटू लागते. तरीही हॉस्पिटलचा प्रत्येक अनुभव आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जातो. या मिनित्ताने घरातील सर्वजण एकत्र येतात, सहकार्य करतात. आणि नंतर जेव्हा आपला पेशंट बरा होऊन घरी येतो तेव्हाचा आनंद काही वेगळाच असतो.
‘ह. म. बने तु. म. बने' मालिकेतील बने कुटुंबावर देखील असाच असा हा प्रसंग आला आहे. मकरंदला हॉस्पीटलमध्ये भरती कराण्यात आले आहे. ‘ह. म. बने तु. म. बने' मालिका हि अल्पावधीत लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे या मालिकेने प्रेक्षकांशी कनेक्ट होतील असे नेहमीच आणलेले विषय. दैनंदिन जीवनातील गंभीर प्रसंगांनाच विनोदी छटा देणे या मालिकेचे वैशिष्ट्य आहे. मकरंदचे हॉस्पीटलाईझेशन बने कुटुंबिय प्रत्येकाच्या खास स्वभावाने कसे हाताळतील हे बघणे मजेशीर असेल.