‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम बघणारी गुणी आणि रूपसुंदर अभिनेत्री हुमा कुरेशी त्या दिवशी अतिशय आनंदात होती; कारण तिचा भाऊ साकिब सलीमने अनपेक्षितपणे या कार्यक्रमाच्या सेटवर तिची भेट घेऊन तिला सुखद आश्चर्याचा धक्का दिला होता! हुमा- साकिब हीसुध्दा बॉलिवूडच्या अन्य भावा-बहिणींसारखीच भावंडे आहेत. त्यांनाही एकमेकांवाचून करमत नाही आणि त्यांच्यात भावा-बहिणीचे अतूट नाते आहे. इंडियाज बेस्ट ड्रामेबाझमध्ये रक्षाबंधनाच्या विशेष भागात हुमाला आपला भाऊ साकिब याच्याबरोबर बालपणीच्या आठवणींमध्ये रमून जाणार आहे. या कार्यक्रमातील या लहान मुलांना (स्पर्धक) त्यांच्या वयापेक्षा कितीतरी सरस आणि परिपक्व अभिनय सहजतेने करताना पाहून सेलिब्रिटी पाहुणे आणि परीक्षक भारावून गेले होते. आपली बहीण हुमाबद्दल साकिबने सांगितले, “हुमा आणि मी हे एकमेकांचे भाऊ-बहीण असण्यापेक्षा एकमेकांचे जिवलग मित्र अधिक आहोत. मला आठवतंय, एकदा आम्ही क्रिकेट खेळत होतो, तेव्हा मी आऊट झालो, तेव्हा हुमाने एक चामड्याचा बॉल मला मारला. मी तेव्हा जवळपास चक्कर येऊन बेशुध्दच पडलो होतो, पण हुमाला माझी चिंता नव्हती. तिला भीती वाटली की मी बहुदा मेलो असेन आणि त्याबद्दल तिला बोलणी खावी लागतील. तेव्हा तिने घरापासून दूर पळून जाण्याचा विचार केला होता.”
साकिब जरी हुमाची गुपिते उघड करीत असला, तरी हुमाच्या तोंडून आपल्या या लहान भावाची स्तुतीच येत होती. हुमा म्हणाली, “साकिब नेहमी माझ्याशी सत्य बोलतो. तो माझी नेहमीच प्रशंसा करीत असला, तरी तोच माझा सर्वात मोठा टीकाकारही आहे.” यावेळी कार्यक्रमातील बच्चेकंपनीबरोबर साकिब मजेत वेळ काढत असताना कार्यक्रमाचा सूत्रसंचालक शंतनू माहेश्वरी याची चेष्टा करण्याची लहर त्याला आली. आपली बहीण हुमा कुरेशीला त्याने लग्नाची मागणी घालावी, अशी सूचना साकिबने त्याला केली. कारण हुमाचे लग्न होऊन ती सासरी गेल्यावर दिल्लीतील आपल्या मोठ्या घराचे आपण एकमेव मालक होऊ, अशी पुस्तीही त्याने यावेळी जोडली. हुमा-साकिब यांच्यातील हे खेळकर नाते अन्य भावा- बहिणींसठी एक चांगले उदाहरण ठरेल.