लेक माझी लाडकी या मालिकेच्या सेटवर झाला अपघात, सायली देवधर थोडक्यात वाचली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 8:48 AM
मालिकांच्या सेटवर अपघात होणे काही नवीन नाही. मालिकांचे चित्रीकरण करत असताना अनेकवेळा अपघात होऊन कलाकारांना दुखापत झाल्याचे आपण ऐकत ...
मालिकांच्या सेटवर अपघात होणे काही नवीन नाही. मालिकांचे चित्रीकरण करत असताना अनेकवेळा अपघात होऊन कलाकारांना दुखापत झाल्याचे आपण ऐकत असतो. असाच अपघात नुकताच लेक माझी लाडकी या मालिकेच्या सेटवर झाला. एका दृश्याचे चित्रीकरण करत असताना सायली देवधरच्या अंगावर पंखा पडला. या अपघातातून ती थोडक्यात वाचली.लेक माझी लाडकी या मालिकेत सायली देवधर मीरा ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेचे प्रेक्षक नेहमीच कौतुक करतात. या मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत.लेक माझी लाडकी या मालिकेच्या कथानकाला आता एक वळण मिळणार आहे. या मालिकेत मीरा आत्महत्येचा प्रयत्न करणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. या दृश्याचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. पण या चित्रीकरणाच्यावेळी एक अपघात घडला. पण या अपघातात सायली थोडक्यात वाचली.लेक माझी लाडकीच्या सेटवर मीरा पंख्याला लटकून आतमहत्या करत असल्याचे दृश्य चित्रीत केले जात होते. या दृश्यासाठी सायली गळ्यात फास अडकवून दृश्य चित्रीत करण्यासाठी तयार होती. पण तेवढ्यात आत्महत्या करण्यासाठी ज्या पंख्याला दोरी बांधण्यात आली होती, तोच पंखा खाली पडला. पंखा जोरात पडला असल्याने एका क्षणासाठी काय झाले हे कोणालाच काही कळले नाही. तो पंखा सायलीच्या खांद्यावर पडला होता. पण तरीही तिला काहीच दुखापत झाली नाही. इतका मोठा अपघात होऊनही सायलीला काहीही झाले नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सायली या अपघातातून थोडक्यात बचावली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सायली देवधर, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, सुनील बर्वे अशी लेक माझी लाडकी या मालिकेची तगडी स्टार कास्ट आहे.