मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) लवकरच झी मराठीवर परीक्षक म्हणून दिसणार आहे. जिथे तो चिमुकल्या स्पर्धकांना मार्गदर्शन करताना दिसणार आहे. आपल्या खाजगी आयुष्यात संकर्षण दोन चिमुकल्यांचा बाबा आहे आणि त्यांनी फादर्स डे दिवशी आपला बाबा म्हणून अनुभव व्यक्त केला.
मी माझ्या बाबांकडून काय शिकलो आणि त्यांचे कोणते गुण घेतले तेही सांगितले. तो म्हणाला की,"मी दोन जुळ्या मुलांचा बाबा आहे. २७ जूनला त्यांना ३ वर्ष पूर्ण होतील. बाबा म्हणून खूप संयम शिकलो आहे आणि माझी नवीन मालिका ‘ड्रामा ज्युनिअर्स’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत ह्या संयमचा खूप उपयोग होणार आहे. आधी मी जितका अधीर होतो तितका राहिलो नाही. कारण लहान मुलांना सांभाळणं, त्यांना वाढवणं अतिशय संयमाचं काम आहे, ते कुठल्या क्षणी काय मागतील, कसे वागतील, कसे पाहतील आणि काय करतील ह्याचा काहीच नेम नसतो. अशावेळी तुम्ही थकलेले असाल, तुम्ही काम करून घरी आलेले असाल, वेगळ्या विचारात असाल त्याच्यावर तुम्हाला रागवून रिअॅक्ट करण्याची परवानगीच नाही. त्यांना कळत नाही की ते आता काय करतायेत त्याच्यामुळे त्यांना सांभाळणं आणि हसतं ठेवणं भयंकर संयमाचं काम आहे.
बाबा म्हणून माझा संयम प्रचंड वाढलाय- संकर्षण
तो पुढे म्हणाला की, एक बाबा म्हणून माझा संयम प्रचंड वाढला आहे. मी माझा राग राखून ठेवतो आणि जीव उधळून प्रेम करतो. मला माझी लहान बाळ एक क्षण ही रडलेले आवडत नाही. मी माझ्या बायकोला शलाकाला तेच सांगतो की ते रडत असताना त्यांना काय पाहिजे ते दे आणि जेव्हा त्यांचं रडणं थांबते. त्यांना मी जवळ घेऊन समजावतो आणि त्यांना ते कळतं. माझ्या बाबांबद्दल बोलायचं झालं तर ते अत्यंत प्रामाणिक, दिलेले ते काम नियमाने नित्याने सचोटनी करणारा माणूस. हा बाबांचा गुण मला खूप आवडतो. त्यांच्यातली भावनिकता आणि खरेपणा खूप आवडतो आणि त्यांचा मुलगा म्हणून मी कायम माझ्या वागण्यात तो प्रामाणिकपण आणि ती भावनिकता आणायचा प्रयत्न करतो. बाबांनी संपूर्ण कुटुंबाला उत्तम आयुष्य कसं द्यायचं हे कटाक्षाने पाळलं आणि एक छान आयुष्य दिलं आणि त्याचंच मी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत आहे. "
संकर्षण कऱ्हाडे ड्रामा ज्युनिअर्समध्ये पहिल्यांदा परीक्षक म्हणून दिसणार आहे. ड्रामा ज्युनिअर्स २२ जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.