Join us

'मी अभिनेता म्हणून जगलो, पण...', 'सिंघम' फेम अभिनेता अशोक समर्थ यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 3:46 PM

Ashok Samarth: अशोक समर्थ यांनी 'लक्ष्य' या मालिकेत एसीपी अभय कीर्तिकर ही भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर तब्बल ८ ते ९ वर्षानंतर ते 'तू तेव्हा तशी'मधून पुन्हा मराठी मालिकेकडे वळलेले पाहायला मिळाले.

झी मराठी वाहिनीवरील 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) ही मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेच्या कथानकात आकाशच्या येण्यामुळे नवीन ट्विस्ट आला आहे. आकाश जोशी हे पात्र अनामिका आणि सौरभच्या नात्यात दुरावा ठरल्याने प्रेक्षकांनी या पात्रावर नाराजी व्यक्त केली आहे. मालिका सुरळीत सुरू असताना मध्येच हे पात्र का टाकले गेले, हा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. आकाशची भूमिका सिंघम फेम अभिनेता अशोक समर्थ (Ashok Samarth) साकारत आहेत. त्यामुळे त्यांना ही भूमिका साकारत असताना प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. आपल्या आयुष्यात अशी एखादी भूमिका साकारण्याची संधी मिळावी. ज्यामुळे आपल्याला ओळखले जाईल ही प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. अशी इच्छा आकाशच्या पात्रामुळे पूर्ण झाली. तसेच प्रेक्षकांकडून होत असलेली टीका हीच माझ्या कामाची पोचपावती आहे, असे अशोक समर्थ यांनी सांगितले.

अशोक समर्थ यांनी लक्ष्य या मालिकेत एसीपी अभय कीर्तिकर ही भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर तब्बल ८ ते ९ वर्षानंतर ते तू तेव्हा तशीमधून पुन्हा मराठी मालिकेकडे वळलेले पाहायला मिळाले. मराठी इंडस्ट्रीत अशोक समर्थ खूप कमी काळ रुळले असे बोलले जाते. नुकतेच एका मुलाखतीत त्यांनी याबाबतचा खुलासा केला.

ते म्हणाले की, मी मूळचा बारामतीचा, चंदेरी दुनियेच्या ओढीने गाव सोडून आलो. पण खंत एवढीच वाटते की या मातीत मला काम करायला मिळालं नाही.बॉलिवूड, भोजपुरी, दाक्षिणात्य प्रातांत मी अभिनेता म्हणून जगलो पण महाराष्ट्रात मला रमू दिलं नाही. रणांगण हे माझं पहिलं नाटक, या नाटकातून मी अभिनयात घडलो. टिपिकल माहोल होता पण माणूस म्हणून घडलो. बारामती सारख्या ग्रामीण भागात पवारवाडीत, मी एका सर्व साधारण शेतकऱ्याच्या कुटुंबात वाढलो. सिनेमाचा प्रवास सुरू झाला तसतसा मी घडत गेलो. लक्ष्य मालिकेने मला मोठी लोकप्रियता मिळाली. आकाश ही भूमिका विरोधी धाटणीची आहे, मला या भूमिकेबाबत जाणून घ्यावे लागले. जवळपास १०० एपिसोड नंतर माझी एन्ट्री झाली. ही भूमिका सशक्त होती, आकाशच्या येण्यामुळे मालिकेला वेगळे वळण मिळाले.

मराठी सिनेइंडस्ट्रीत मला नक्कीच काम करायचे आहे. मराठी चित्रपट ताकदवान बनत आहेत. मी मराठी इंडस्ट्रीत रमत नाही असे नाही, पण इथे मला अनेकांकडून वेगवेगळे सल्ले मिळाले. तू खूप उंच आहेस, तू महाराष्ट्रीयन वाटत नाहीस, ग्रामीण भाषेतून आल्याने तुझी भाषा शुद्ध नाही, असे माझ्याबाबत म्हटले गेले. मग यावर खूप विचार केला, खूप स्ट्रगल केला. बॉलिवुड, भोजपुरी चित्रपटातून मला कामे मिळत गेली. खूप वर्षानंतर मला आकाश जोशी हे पात्र साकारायला मिळाले, याचा मला आनंद आहे’.
टॅग्स :झी मराठी