Join us

'खरंच भारावून गेले मी..!', 'रंग माझा वेगळा' फेम अश्विनी उर्फ वैशाली भोसलेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 4:31 PM

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) सध्या रंजक वळणावर आली आहे. या मालिकेचे कथानक आणि पात्रांना रसिकांची पसंती मिळताना दिसते आहे. या मालिकेतील कलाकारांबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना आवडते. या मालिकेत अश्विनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैशाली राहुल भोसले (Vaishali Rahul Bhosale) सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिची सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्री वैशाली भोसलेची रंग माझा वेगळा मालिकेच्या सेटवर बऱ्याच वर्षानंतर अभिनेता मिलिंद शिंदे यांची भेट झाली. तिने त्यांच्यासोबत एका चित्रपटात काम केले होते. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मिलिंद शिंदेंसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की,  २०११ मध्ये सरांना भेटले होते.. अर्थात निमित्त होतं सिनेमा.. शूटींग..! माझ्या आयुष्यातला पहिला सिनेमा.!! (तो काही कारणास्तव अजून प्रदर्शित झाला नाही ती गोष्ट वेगळी). पहिल्यांदाच शूटसाठी घरापासून दूर राहायचं होतं.. जरा दडपण होतंच..त्यात मिलिंद शिंदे सरांसोबत काम करायचं होतं.. खूप घाबरले होते. पण सेटवर गेल्यावर सतीश नाईकने (ज्याच्यामुळे मी मिलिंद सरांसोबत काम करु शकले.. सिनेमाचा सहायक दिग्दर्शक) सरांसोबत ओळख करून दिली. सर इतकं छान बोलले माझ्यासोबत..माझी सगळी भीती पळून गेली. त्यांनी इतकं छान आपलंसे करून घेतले.. त्या पाहिल्या दिवसापासून ते शूट संपेपर्यंत सर आणि त्यात आणखी सुखाची सर म्हणजे छाया कदम मॅडम दोघांनी इतकं जपलं मला.. खूप माया केली. तेच प्रेम तीच आपुलकी आजच्या भेटीतही जाणवली मला..

तिने या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, मिलिंद सर तुम्ही कमाल आहात..उगाच तुम्ही मोठे नाही आहात.. तुम्ही आहातच तसे..! आज ११ वर्षानंतरही सरांना मी आठवतेय, सगळं आठवतंय.. हे पाहून खरंच भारावून गेले मी..! इतकंच नाही तर त्याही आधी वर्ष नेमकं आठवत नाही.. २००५ किंवा २००६ असावं बहुधा तेव्हा मी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे सर यांच्या 'शाळा' या सिनेमात सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. मिलिंद शिंदे सर त्यात महत्वाची भूमिका करत होते. गप्पांच्या ओघात मिलिंद सरांनी याचीही आठवण करून दिली.. इतकं भारी वाटलं मला.. शब्दात सांगता येणार नाही इतकं छान वाटलं..! आज आमच्या 'रंग माझा वेगळा'च्या सेटवर सर पुन्हा भेटले. आमचा एकत्र सीन नव्हता.. पण ही ग्रेट भेट निश्चित होती बहुधा..! 

टॅग्स :स्टार प्रवाह