छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातच पारु ही नवीन मालिका नुकतीच सुरु झाली आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये तिची चर्चा रंगली होती. त्यामुळे या मालिकेच्या कथानकाविषयी आणि खासकरुन त्यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. नुकतंच या मालिकेतील पारुने तिच्या ऑडिशनचा किस्सा सांगितला आहे. या मालिकेसाठी तिची निवड कशी झाली यामागची स्टोरी तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
पारु या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे हिने पारु ही मुख्य भूमिका साकारली आहे. गावाकडची निरागस, परकल पोलकं आणि दोन वेण्या घालणाऱ्या पारुचा लूक पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले. त्यामुळे मालिका प्रसारित होण्यापूर्वीच तिचा चाहतावर्ग तयार झाला आहे."मला एक कॉल आला होता आणि पारू नावाची भूमिका आहे त्यासाठी ऑडिशन सुरु आहे तू येऊ शकशील का? असं मला सांगितलं. त्यावर मी लगेच होकार दिला आणि निघाले. मला नंतर कळलं की त्या ऑडिशन लिस्टमध्ये मी शेवटची मुलगी होते. ऑडिशनच्या मागची मजेशीर गोष्ट मला सांगयला आवडेल. तुम्ही पारूचा लुक पाहिलाच असेल, पारू एक गावाकडची मुलगी आहे जी परकर पोलकं घालते. ज्या दिवशी ऑडिशनसाठी कॉल आला त्यावेळी मी कामानिमित्त बाहेर होते. मी आईला कळवले की परकर पोलकं घालून एक ऑडिशन शूट करायचं आहे. तेव्हा माझी आई ताबडतोब परकर पोलकं आणायला बोरिवलीहुन लालबागला गेली. तिथे तिला सापडले नाही मग ती तिथून दादर मार्केटला गेली तिथे फायनली एका दुकानात तिला परकर पोलकं मिळालं", असं शरयूने सांगितलं.
पुढे ती म्हणते, "माझ्या आईनेच मोबाईलवर ऑडिशन शूट केलं. पारू या पात्रासाठी माझी निवड झाली याचं श्रेय मी आईला देईन. तिच्या मेहनत आणि आशिर्वादाने ते ऑडिशन इतक्या छानपणे पार पडले. माझा परिवार, नातेवाईक आणि मित्र मंडळी खूप खुश झाले जेव्हा त्यांनी पारूच्या प्रोमो पाहिला आणि त्याहुन जास्त आनंद त्यांना या गोष्टीचा झाला की मी झी मराठीची मालिका करतेय कारण झी मराठीच्या मालिका लोकांच्या मनात वेगळाच घर करून जातात. सगळे अतिशय खुश आहेत आणि सोशल मीडियावर ही मला छान प्रतिसाद मिळत आहे. मालिकेमध्ये पारू सोबत एक गोडशी बकरी आहे जी तिची मैत्रीण आहे. पारूने तीच नाव वैजू ठेवलंय. पारूला आई नाही त्यामुळे तिच्या सुख दुःखात क्षणात वैजूच तिची जवळची मैत्रीण आहे. मला मुळात प्राणी खूप आवडतात त्यांना कसं सांभाळायचं हे मला चांगलं जमतं. मीच वैजूला खाऊ घालते आणि तिच्याशी खेळते. कधी - कधी जेव्हा आमच्या शूटच दुसरीकडे शिफ्टिंग होत असत तेव्हा तिचं म्हणणं असत की तिला ही सोबत घेऊन जायचं आणि हे ती तिच्या खुणांच्या भाषेनी सांगते. माझं वैजूशी फक्त ऑनस्क्रीन नाही तर ऑफस्क्रीन ही वेगळंच ट्युनिंग आहे."
दरम्यान, शरयू एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. तिने १५ वर्ष भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतं आहे. सोबतच तिने हेमा मालिनीसोबत योशोदा कृष्णामध्येही स्टेजवर परफॉर्म केलं आहे. तसंच पिंकीचा विजय असो या मालिकेतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.