मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे किरण माने (kiran mane). उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळेही किरण माने सातत्याने चर्चेत येत असतात. यात बऱ्याचदा ते समाजात घडणाऱ्या घटना, त्यांच्या जीवनातील लहानमोठे किस्से ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी सिंधुताई माझी माई या मालिकेतील एका सहकलाकाराविषयी भाष्य केलं आहे.
'सिंधुताई माझी माई' या मालिकेत किरण माने सध्या अभिमान साठे ही भूमिका साकारत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा ते या मालिकेविषय़ी काही ना काही पोस्ट करत असतात. अलिकडेच त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये या मालिकेतील एका सीनविषयी आणि अभिनेता अतुल आगलावे या विषयी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
"बाप म्हणे, लेक माझी आंजूळ मंजूळ...आधी भरील वंजूळ, मग टाकील तांदूळ !" ...लाडक्या लेकीला आणि जावयाला भेटून अभिमान साठेचं काळीज सुपाएवढं झालं. अभिनेता होणं आणि लेखकानं मनापास्नं लिहीलेली दर्जेदार भुमिका मिळणं यासारखं दूसरं समाधान नाही ! नटाला एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगायला मिळतात. त्यातली काही आपलं आयुष्य समृद्ध करून जातात. सगळ्या दुनियेनं नाकारलेल्या चिंधीला अभिमाननं दुनियाभरची माया दिली... शिकवलं... जपलं... तुकोबारायाच्या विचारांचा वारसा दिला...दहा वर्षांच्या अंतरानं चिंधीचा संसार पहायला जाताना त्याचं मन भरून आलं. तिच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला जावई आणि गोड नातवंडांमध्ये रमून गेला. सासरच्या इतर माणसांकडुन तिरस्कार अनुभवणार्या मुलीची वेदनाही नजरेतनंच त्यानं ओळखली... निरोप घेताना, तिने घट्ट पकडलेल्या हातातून हात सोडवताना... आसवांनी भरलेल्या अनिमिष नजरेवरुन नजर खेचून तोडुन, पाठ वळवून जाताना त्याची पावलं अडखळली..., "असं किरण माने यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणतात, "या भुमिकेनं आयुष्यभर पुरून उरेल एवढं दान दिलं. लहान चिंधीची भुमिका करणारी अनन्या जितकी गोड होती, तितकीच मोठी चिंधी शिवानी सोनार लोभस आहे ! तिच्याबरोबर भावनिक प्रसंग साकारताना दोघेही खूप भावुक झालो... जावई झालेला अतुल आगलावे माझ्यासमोर घडलेला अभिनेता. माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचा म्युझीक ऑपरेटर होता तो... तिथुन नायकाच्या भुमिकेपर्यन्त त्यानं केलेल्या संघर्षाचा मी साक्षीदार आहे. त्याच्या बरोबरचा एक सिन अफलातून होता. दोघांनीही 'दिल से' केला तो. अशी 'दिलकश' भुमिका आणि असे दिलदार सहकलाकार लाभणं हे लै लै लै आनंद देणारं आहे ! 'सिंधुताई' मालिकेनं अभिनेता असण्याचं खूप मोठं अवॉर्ड दिलं मला... अभिमान साठेच्या रुपात !"