Join us

रिअ‍ॅलिटी शोमध्ये उडवली पंतप्रधान मोदींची खिल्ली; केंद्र सरकारने पाठवली मीडिया हाऊसला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 5:09 PM

Pm narendra modi: सात दिवसांच्या आत मीडिया हाऊसला उत्तर देणं बंधनकारक असल्याचं सांगण्यात येत आहे.

एका रिअॅलिटी शोदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवल्याचं प्रकरणं नुकतंच समोर आलं आहे. या प्रकरणी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने झी एंटरटेनमेंट इंटरप्राइजेज लिमिटेडला नोटीस पाठवली आहे. इतकंच नाही तर पंतप्रधानांची खिल्ली उडवल्याप्रकरणी या शोच्या प्रसारणाबाबत स्पष्टीकरणदेखील मागितलं आहे.  छोट्या पडद्यावरील ‘ज्युनियर सुपर स्टार्स सीझन ४’ या रिअॅलिटी शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं विडंबन केल्याचा आरोप वाहिनीवर करण्यात आला आहे.

झी तामिळ या वाहिनीवर ‘ज्युनियर सुपर स्टार्स सीझन ४’ हा रिअॅलिटी शो सुरु असून यात दोन लहान मुलांनी पंतप्रधान मोदी यांचं कथितपणे खिल्ली उडवणारं स्किट सादर केलं.  हा भाग १५ जानेवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता. हा भाग पाहिल्यानंतर भाजपाने चिंता व्यक्त करत झी एंटरटेनमेंट इंटरप्राइजेज लिमिटेडला नोटीस पाठवली आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडूमधील भाजपच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सीटीआर निर्मल कुमार यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवर कारवाई करत मंत्रालयाने मीडिया हाऊसला सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

कार्यक्रमादरम्यान लहान मुलं जाणूनबुजून पंतप्रधान मोदींविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करत होते. इतकंच नाही तर शोमध्ये नोटाबंदी, पंतप्रधान मोदी यांचे विविध देशांमधील राजकीय दौरे आणि त्यांचा पोशाख याबद्दल निंदनीय टिप्पणी करण्यात आली होती, असं निर्मल कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​मुख्य क्लस्टर ऑफिसर सिजू प्रभाकरन यांनी सांगितल्याप्रमाणे, ते कार्यक्रमाशी संबंधित सर्व प्रकारचा भाग काढून टाकणार आहेत. तसंच याविषयी लवकरच स्पष्टीकरण देतील. त्यांची कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स टीम या प्रकरणी लक्ष देत आहे. तसेच प्रभाकरन यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला, असं निर्मल कुमार म्हणाले आहेत.

टॅग्स :नरेंद्र मोदीराजकारणटेलिव्हिजनभाजपा