अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित पुण्यश्लोक अहिल्याबाई (Punyashlok Ahilyabai) या ऐतिहासिक मालिकेस त्यातील आकर्षक कथानकामुळे प्रेक्षकांनी पहिल्यापासूनच डोक्यावर घेतले आहे. या मालिकेत अहिल्याबाईंच्या उदात्त कार्याचे चित्रण आहे. अहिल्याबाई ही आपल्या काळाच्या खूप पुढे असलेली स्त्री होती, जिने आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर समाजातील अनिष्ट रूढींचा विरोध केला आणि लोकांच्या कल्याणसाठी त्या आयुष्यभर झिजल्या. सध्या सुरू असलेल्या कथानकात ‘सती’ या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे. खंडेराव होळकर यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अहिल्याबाईंच्या जीवनातील हा आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. अहिल्याबाई त्यांनी केलेल्या विविध सुधारणांबद्दल ओळखल्या जातात. सती प्रथा नष्ट करणे, त्यापैकीच एक आहे. कुम्हेरच्या लढाईत जेव्हा खंडेराव हुतात्मा झाला, तेव्हा अहिल्याबाईंनी जीवनातील सर्व इच्छा-आकांक्षांवर पाणी सोडले आणि आपल्या दिवंगत पतीसोबत सती जाण्याचे ठरवले. मल्हारराव होळकर हे पहिल्यापासून अहिल्याबाईंच्या जीवनाचे आधारस्तंभ होते. मल्हारराव होळकर हा एक मोकळ्या मनाचा, उमदा माणूस होता आणि ज्यांचा समाजातील रूढीवादी मान्यतांवर आणि परंपरांवर विश्वास नव्हता. अहिल्याबाईंना सती जण्यापासून परावृत्त करणारे मल्हारराव होळकरच होते. त्यांना ठामपणे असे वाटत होते की, केवळ अहिल्याबाईंमध्येच राज्यकारभार सांभाळण्याची क्षमता आहे. आपला मुलगा खंडेराव याच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंना गमावणे मल्हाररावांना परवडण्यासारखे नव्हते. म्हणून, ते नेहमीप्रमाणे खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
'मल्हारराव जर रूढीवादी असते, तर...', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई'मधील सती विषयक कथानकाबद्दल राजेश शृंगारपुरेनं व्यक्त केलं मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 19:53 IST