प्रसिद्धी आयलवार सध्या नकुशी...तरी हवीहवीशी या मालिकेत नकुशी ही मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेद्वारे तिने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या या अभिनयप्रवासाविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...
अभिनेत्री बनण्याचे तू लहानपणापासूनच ठरवले होते का?
माझ्या घरातील वातावरणामुळे मी अभिनयक्षेत्र खूपच जवळून पाहिले आहे. माझे वडील अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य आहेत. तसेच नागपूरात अनेक नाटकांचे ते आयोजन करतात. या सगळ्यामुळे या क्षेत्राविषयी मला लहानपणापासून आवड आहे. तसेच मी लहानपणापासून नृत्यदेखील शिकले आहे. मी सातवीत असेपर्यंत नृत्य, अभिनय यांना वेळ देत होते. पण यामुळे माझे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे असे मला वाटल्याने मी हे सगळे सोडून केवळ शिक्षणाकडे लक्ष दिले. दहावी, बारावीला मला खूपच चांगले मार्क मिळाले. बारावीनंतर आपण आता डेन्टिस्ट बनूया असे मी ठरवले आणि त्यासाठी अनेक कॉलेजमध्ये फॉर्मदेखील भरले आणि त्यातून एका कॉलेजच्या लिस्टमध्ये माझे नावदेखील आले. पण प्रवेश घेण्यापूर्वी काहीतरी चुकतेय, मला खरेच डेन्टिस्ट बनायचे आहे का असे प्रश्न माझ्या मनात येत होते. हा मी विचार करत असताना माझ्या वडिलांनी मला ललित कला केंद्राविषयी सांगितले. याविषयी ऐकल्यावर मला याच कॉलेजमध्ये शिकायचे असे मी मनाशी ठरवले. कॉलेजची सगळी माहिती काढली. प्रवेशासाठी अर्ज भरला. त्यानंतर माझी मुलाखत झाली आणि या कॉलेजमध्ये माझा प्रवेश झाला आणि खऱ्या अर्थाने मी अभिनय या क्षेत्राकडे वळले.
तुझे बालपण नागपूरमध्ये तर शिक्षण पुण्यात झाले आहे. मग तू मुंबईत कधी आलीस?
ललित कला केंद्रामधून शिक्षण घेतल्यानंतर मी पुण्यात एका थिएटर ग्रुपसोबत काम करत होती. मी त्यांच्या इंग्रजी नाटकात काम केले. त्याचवेळी मी मुंबईत येऊन ऑडिशन्स देखील देत असे. मुंबई-पुणे असा माझा त्यावेळी अनेकवेळा प्रवास होत असे. असेच एकदा मी नकुशी या मालिकेसाठी ऑडिशन दिले. ऑडिशननंतर माझी स्क्रीन टेस्ट झाली आणि या मालिकेसाठी माझी निवड झाली. मी दोन तिनदा तिथे गेली असली तरी मी नकुशीसाठी ऑडिशन देत आहे याची मला कल्पनाच नव्हती.
नकुशी या मालिकेने तुझे आयुष्य किती बदलले?
कलाकार म्हणून या मालिकेने मला एक वेगळी ओळख मिळवून दिली. नकुशी या मालिकेमुळे आज मला महाराष्ट्रातील अनेक लोक ओळखत आहेत. या मालिकेचे चित्रीकरण करत असताना ही माझी पहिली मालिका आहे असे मला कधीच वाटले नाही. या मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांचे चित्रीकरण तर आम्ही साताऱ्यात केले होते. पण सुरुवातीपासूनच माझ्या टीमने मला खूप समजून घेतले. उपेंद्र लिमये यांच्यासोबत काम करताना तर मला चांगलेच टेन्शन आले होते. कारण त्यांचे चित्रपट, मालिका मी बघितल्या आहेत. त्यांच्या अभिनयाची मी फॅन आहे. त्यांच्यासोबत काम कसे करायचे याचे मला दडपण आले होते. पण पहिल्याच दिवशी त्यांनी मला खूप कर्म्फटेबल केले. ते आपल्या सहकलाकाराला खूपच चांगल्याप्रकारे समजून घेतात.
अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीसाठी तुला घरातून कशाप्रकारे पाठिंबा मिळाला?
माझे वडील याच क्षेत्राशी संबंधित असल्याने या क्षेत्रात काम करण्यास त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. पण माझ्या आईला माझा निर्णय तितकासा पटला नव्हता. मी डेन्टिस्ट बनावे असेच तिला वाटत होते. डेन्टिस्ट बनल्यास माझे या क्षेत्रात करियर खूप चांगले होईल असे तिला वाटत होते. पण मी माझ्या मतावर ठाम होते. मात्र आज माझ्या मालिकेला मिळालेल्या यशामुळे ती खूप खूश आहे. लोक तिला नकुशीची आई म्हणून आज ओळखतात याचा तिला अभिमान आहे.
तू नृत्य शिकली आहेस, त्यामुळे नृत्याच्या क्षेत्रात काही करियर करण्याचा विचार केला आहेस?
नृत्य हे मला खूप आनंद देते. भावना व्यक्त करण्याचे हे एक माध्यम आहे असे मला वाटते. मी अनेकवेळा घरात एकटी नाचते. मला त्यामुळे एक वेगळे समाधान मिळते. पण या क्षेत्रात करियर करण्याचा मी काहाही विचार केलेला नाही.