छोट्या पडद्यावर आता अभिनयाला नव्हे तर दिसण्याला महत्त्वः किरण करमरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2017 9:41 AM
किरण करमरकर यांनी दिनमान या मराठी मालिकेद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर कहानी घर घर की, दामिनी, इतिहास यांसारख्या ...
किरण करमरकर यांनी दिनमान या मराठी मालिकेद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर कहानी घर घर की, दामिनी, इतिहास यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये ते झळकले. कहानी घर घर की या मालिकेतील ओम या व्यक्तिरेखेमुळे त्यांना केवळ भारतातच नव्हे तर जगभर लोकप्रियता मिळाली. ढाई किलो प्रेम या मालिकेत ते सध्या झळकत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...ढाई किलो प्रेम या मालिकेत तुम्ही कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहात?या मालिकेत मी नायकाच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. मी गेल्या वर्षी तमन्ना या मालिकेत काम केले होते. या मालिकेत मुलीला नेहमी पाठिंबा देणाऱ्या वडिलांची भूमिका मी साकारली होती. त्यामुळे मला त्याचप्रकारच्या भूमिका ऑफर केल्या जात होत्या. पण मला काहीतरी वेगळे साकारायचे होते. संदिप सिकंद हे या मालिकेचे निर्माते आहेत. कहानी घर घर की या मालिकेपासून त्यांना मी ओळखतो आणि त्यामुळे त्यांना मी मालिकेसाठी लगेचच होकार दिला. तसेच या मालिकेची कथा मला खूप आवडली. माझी या मालिकेतील भूमिका गंमतशीर वाटल्याने मी या मालिकेत काम करायचे ठरवले. मी या मालिकेत माझ्या मुलाला कस्पटासमान वागवतो. अतिशय तिरसट बापाची भूमिका मी या मालिकेत साकारत आहे.कहानी घर घर की ही मालिका तुमच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरली असे तुम्हाला वाटते का?कहानी घर घर की या मालिकेने मला एक चेहरा मिळवून दिला. या मालिकेमुळे केवळ देशातच नव्हे तर जगभरातील लोकांचे प्रेम मला मिळवून दिले. त्यामुळे ही मालिका माझ्यासाठी नेहमीच खास आहे. पण मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दामिनी या मालिकेत काम केले होते. या मालिकेआधी मी एक स्ट्रगलर अभिनेता होतो. पण या मालिकेने मला एक ओळख मिळवून दिली. तसेच फिल्मिस्तान या स्टुडिओच्या बाहेर अनेक वर्षांपूर्वी मला इर्शाद हाश्मी भेटले होते. त्यांच्यामुळे माझा जाहिरातक्षेत्रातील प्रवेश सुरू झाला. त्यामुळे या जाहिराती आणि दामिनी ही मालिका माझ्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरले असे मी म्हणेन.हिंदीत काम करताना कधी भाषेचा अडसर आला नाही का?प्रत्येक भाषेची एक गती असते. भाषा बोलताना तुम्हाला त्याच गतीने बोलावे लागते. इतिहास ही मालिका मी अनेक वर्षांपूर्वी केली होती. या मालिकेचे दिग्दर्शन गोगी आनंद होते. त्यांनी मला हिंदी भाषा बोलताना कोणत्या गतीने ती बोलावी याचे बारकावे शिकवले. त्यामुळे हिंदीत काम करताना कधीच भाषेचा अडसर जाणवला नाही. तुमच्या मालिकेतील नायक आणि नायिका हे दोघेही जाडे असल्याचे दाखवण्यात आले आहे. दिसण्याचा कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात किती फरक पडतो असे तुम्हाला वाटते?माझ्यामते कोणाच्याही दिसण्यापेक्षा त्यांचे काम, कर्तत्व हे अधिक महत्त्वाचे असते. तुम्ही काम चांगले करत असाल तर तुम्ही लोकांना आवडतात. तुम्ही तुमच्या दिसण्यावर नव्हे तर शिक्षणावर, कर्तत्वावर एखाद्या पोस्टवर पोहोचता. त्यामुळे सौंदर्य ही गोष्ट महत्त्वाची नसते असे मला वाटते.गेली अनेक वर्षं तुम्ही छोट्या पडद्यावर काम करत आहात, गेल्या अनेक वर्षांत छोट्या पडद्यावर काय बदल घडले आहेत असे तुम्हाला वाटते?गेल्या काही वर्षांत छोट्या पडद्यावर प्रचंड पैसा आला आहे. त्यामुळे मालिकांचे भव्य सेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच कलाकारांना, तंत्रज्ञाना चांगला पैसा मिळत आहे. रंगभूषा, वेशभूषा यांवर प्रचंड पैसा खर्च केला जात आहे. पण गेल्या काही वर्षांत छोट्या पडद्यावर अभिनयक्षमता खालवली आहे असे मला वाटते. काही नटांना तर साधे एक वाक्यदेखील बोलता येत नाही. हम लोग, बुनियाद यांसारख्या मालिकांच्या काळात एकापेक्षा एक सरस अभिनेते आपल्याला पाहायला मिळत होते. पण आता अभिनयापेक्षा दिसण्याला अधिक महत्त्व दिले जात आहे असे मला वाटते.