यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार (Star Pravah Pariwar Awards) सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पुरस्कार कोणत्या सदस्यांना मिळणार याचं कुतूहल आहे. त्याचसोबत कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स सोहळ्याची शान वाढवणार आहेत. यंदाच्या सोहळ्याची खासियत म्हणजे सासू-सुनांचे धमाकेदार परफॉर्मन्स. एरव्ही मालिकांमध्ये सासू- सुनांना आपण वेगळ्या रुपात पहात असतो. मात्र स्टार प्रवाह परिवार सोहळ्यात याच सासू- सुनांचं अनोखं रुप पाहायला मिळणार आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेतील गौरी-माई, रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा- सौंदर्या, अबोली मालिकेतील अबोली-रमा आणि आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती- अनघाचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना या सोहळ्याच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल. तसेच सध्या सोशल मीडियावर कलाकारांच्या रिहर्सलचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता खूपच वाढली आहे.
परिवार असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. जेव्हा सारे एकत्र येतात तेव्हा सोहळा होतो आनंदाचा, आपुलकीचा आणि कौतुकाचा. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा रविवार ३ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.