आज देशात सर्वत्र भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय आपला ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. स्वातंत्र्यदिनी मराठी अभिनेत्रीने मात्र एक खरमरीत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने समाजातील घडणाऱ्या घटनांवर भाष्य करत सणसणीत चपराक लगावली आहे.
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री यशश्री मसुरकर हिने तिच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये यशश्री पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालून हातात तिरंग्याच्या रंगाचा फुगा घेऊन उभी असल्याचं दिसत आहे. "हमे देखनी हे आजादी", हे गाणं या व्हिडिओला तिने दिलं आहे. या व्हिडिओमध्ये देशातील महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांचा लेखाजोगा अभिनेत्री मांडला आहे. त्यानंतर हातातील फुगा ती हवेत सोडताना दिसत आहे. "आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार?" असा प्रश्न या व्हिडिओतून यशश्री विचारत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने "बलात्कारी, शिकारी आणि अत्याचार करणाऱ्या सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा", असं कॅप्शन दिलं आहे. यशश्रीच्या या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
यशश्री अभिनेत्री असण्याबरोबरच व्हॉइस आर्टिस्टदेखील आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'रंग बदलती ओढणी', 'चक्रवर्ती अशोक सम्राट', 'दो दिल बांधे एक डोरी से' या हिंदी मालिकांमध्ये ती दिसली होती. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात यशश्री सहभागी झाली होती.