'इंडियन आयडॉल' हा टीव्हीवरील लोकप्रिय रिएलिटी शोपैकी एक आहे. या शोच्या पहिल्या पर्वाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. २००४ साली 'इंडियन आयडॉल'चं पहिलं पर्व प्रसारित करण्यात आलं होतं. याच शोमुळे मराठमोळा अभिजीत सावंत प्रसिद्धीझोतात आला. 'इंडियन आयडॉल १' चा अभिजीत विजेता ठरला होता. तर अमित साना या शोचा रनर अप होता. अभिजीत आणि अमितमध्ये 'इंडियन आयडॉल'चं विजेतेपद मिळवण्यासाठी चुरशीची लढाई झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता 'इंडियन आयडॉल'बाबत अमित सानाने मोठा खुलासा केला आहे.
अभिजीत सावंतला जिंकवण्यासाठी माझ्या वोटिंग लाइन्स बंद केल्याचा खुलासा अमित सानाने केला आहे. 'सिद्धार्थ कनन'ला दिलेल्या मुलाखतीत अमितने तब्बल १९ वर्षांनी इंडियन आयडलबाबत भाष्य केलं आहे. तो म्हणाला, "अभिजीत सावंतला या शोमध्ये मुद्दाम जिंकवण्यात आलं. त्याला जिंकवण्यासाठी दोन दिवस आधीच माझ्या वोटिंग लाइन्स बंद करण्यात आल्या होत्या." इतक्या वर्षांनंतर याबाबत बोलायचं नव्हतं, असं म्हणत अमित सानाने अभिजीतची माफीदेखील मागितली.
"अभिजीतला केवळ प्रसिद्धी मिळाली. पण, मला लोकांनी गांभीर्याने घेतलं," असंही अमित साना म्हणाला. अमित सानाने इतक्या वर्षांनंतर 'इंडियन आयडॉल' आणि अभिजीत सावंतबाबत केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याने रिएलिटी शोवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अमितने अभिजीतबरोबरच राहुल वैद्यबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. या शोचा राहुल दुसरा रनर अप होता. अमित म्हणाला, "राहुल आणि माझी अनेकदा भांडणं व्हायची. त्याला शोमध्ये ताकदवान दाखवायचं होतं. तो नेहमी अशाच लोकांच्या संपर्कात राहायचा जे पावरफुल आहेत. त्याचे राजकीय क्षेत्रातही संबंध आहेत."
'इंडियन आयडॉल'नंतर अमित सानाने 'जो जीता वही सुपरस्टार' या शोमध्ये सहभाग घेतला होता. पण, या शोच्या काही भागांनंतरच त्याला शोमधून एक्झिट घ्यावी लागली होती. त्यानंतर त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांत गाणी गायली.