सायली कांबळे ( sayli kamble) हे नाव सध्या कोणालाही नवीन नाही. ‘इंडियन आयडल 12’ची सेकंड रनर अप ठरलेल्या सायलीने आपल्या गोड आवाजामुळे सगळ्यांनाच मोहित केलं. त्यामुळे सोशल मीडियावर तिची वरचेवरच चर्चा रंगत असते. काही महिन्यांपूर्वीच सायलीने प्रियकर धवलसोबत लग्नगाठ बांधली. या सोहळ्यातील अनेक फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्येच तिने या लग्नातील हायलाइट्सचा एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिची आणि धवलची लव्हस्टोरी सांगितली आहे.'इंडियन आयडॉल' हा शो सुरु असताना सायलीचं नाव शोचा कंटेस्टंट निहाल तारोसोबत जोडलं गेलं होतं. पण हा केवळ शोचा टीआरपी वाढवण्यासाठीचा फंडा होता असं म्हटलं जातं. हा शो संपल्यानंतर सायलीने तिच्या लव्हलाइफविषयी जाहीरपणे खुलासा केला. ती धवलला डेट करत असल्याचं तिने सांगितलं.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सायलीच्या लग्नातील प्रत्येक विधी सुंदररित्या कोलाज करण्यात आली आहे. यात हळदी, मेहंदी ते सप्तपदींपर्यंत प्रत्येक विधी दाखवण्यात आली आहे. यामध्येच सायलीने तिची आणि धवलची ओळख कशी झाली हेदेखील सांगितलं.
सायली आणि धवलची ओळख एका कॉमन फ्रेंडमुळे झाली. सायलीच्या मैत्रिणीने तिच्या डीपीमध्ये सायलीसोबतचा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहिल्यावर धवलने या मैत्रिणीकडे सायलीविषयी चौकशी केली. त्यानंतर या मैत्रिणीनेच सायली-धवलीच पहिली भेट घडवून दिली. त्यानंतर ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि कुटुंबाच्या संमतीने त्यांनी लग्नगाठ बांधली. सायली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.