मुंबई-
सोनी टेलिव्हिजन वाहिनीवरील लोकप्रिय डान्स रिआलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सर सीझन-२ (Indias Best Dancer 2) ला बेस्ट का नेक्स्ट (Best Ka Next) अवतार मिळाला आहे. महाराष्ट्राची मराठमोळी डान्सर सौम्या काबंळे (Saumya Kamble) हिनं इंडियाज बेस्ट डान्सर सीझन-२ चा किताब पटकावला आहे. सौम्याला सोनी एन्टरटेन्मेंट वाहिनीकडून १५ लाख रुपयांचा धनादेश देऊन तिचा सन्मान करण्यात आला आहे. तसंच तिला एक आलिशान कार देखील बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे. संपूर्ण सीझनमध्ये सौम्याला प्रशिक्षण देणारी नृत्य प्रशिक्षक वर्तिका झा (Vartika Jha) हिला देखील सन्मानित करण्यात आलं आहे. सौम्या कांबळे मूळची पुण्याची आहे.
वर्तिका झा हिला ५ लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. वर्तिकानं सलग दुसऱ्यांना सीझनमध्ये विजयी नृत्य प्रशिक्षक म्हणून आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या सीझनमध्ये वर्तिका झा हिनं टायगर पॉप याला प्रशिक्षण दिलं होतं. अंतिम ५ जणांमधून यावेळी जयपूरचा गौरव सरवन याला उपविजेता आणि ओदिशाची रोजा राणा दुसरी उपविजेता ठरली आहे. आसामचा रक्तिम ठाकुरिया याला तिसरं स्थान मिळालं आहे. तर जमरूध याला चौथा क्रमांक मिळाला. या सर्व स्पर्धकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
आशा भोसले म्हणाल्या होत्या 'हेलन'ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सौम्या कांबळे हिचा डान्स पाहून तिला छोटी हेलन अशी उपमा दिली होती. सौम्या कांबळे हिची स्वत:ची वेगळी नृत्य शैली, बेली डान्सिंग आणि फ्री-स्टाईल डान्समुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरली. सौम्याच्या वडिलांना तिनं डॉक्टर बनावं अशी इच्छा होती तर आईनं मात्र आपल्या मुलीनं डान्सरच व्हावं असं स्वप्न पाहिलं होतं. कारण सौम्याला लहानपणापासूनच डान्स करायला खूप आवडायचं. आज सौम्यानं आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं आहे.