ओमंग कुमार यांनी 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ'मधील स्पर्धक दिपालीला दिली ही ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 12:06 PM2018-09-08T12:06:38+5:302018-09-09T06:00:00+5:30
'इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ' हा भारतातील एकमेव अभिनयावर आधारीत असा रिएलिटी शो असून ह्या पर्वातील अफलातून कलाकार स्पर्धकांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे
झी टीव्हीवरील 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ' हा भारतातील एकमेव अभिनयावर आधारीत असा रिएलिटी शो असून ह्या पर्वातील अफलातून कलाकार स्पर्धकांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. दर आठवड्याला ह्या शोमधील टॉप स्पर्धक आपल्या जबरदस्त ड्रामेबाझी, परिपक्वता आणि आत्मविश्वासासह अख्ख्या देशावर आपला ठसा उमटवत आहेत. अर्थात, हे सगळे त्यांना सहज मिळालेले नाही. ह्यापैकी काही स्पर्धकांनी खूप कठीण गोष्टींचा सामना केला असून ह्या शोमध्ये सितारे बनण्याआधी आपल्या आयुष्यातील मोठमोठ्या संकटांना परतावून लावले आहे.
अशीच एक छोटी ड्रामेबाझ आहे दिपाली. जिच्या वडिलांनी त्यांच्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या झटकल्या आणि अख्ख्या परिवाराला संकटात टाकले. दिपालीच आपल्या घरातील कमावती असून दिपालीची आई एकटी आपल्या दोन्ही मुलींना लहानाचे मोठे करत आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी मोठ्या आर्थिक टंचाईला तोंड दिले आहे. ह्या शोमध्ये आगामी एपिसोड्स चित्रीत करताना ड्रामेबाझ दिपाली, अँजेलिका आणि रामू श्रीनिवास श्रीसा यांनी भगवान शंकर आणि भस्मासूरची कथा सांगताना उत्तम परफॉर्मन्स दिला. ह्या परफॉर्मन्सनंतर दिपालीच्या आईने आपल्या मुलीचे तोंडभरून कौतुक केले आणि ती अतिशय भावुक झाली. आपल्या मुलीचा अभिमान वाटत असलेल्या त्या माऊलीने हेही सांगितले की त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ती आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पुरेसे पैसे जोडू शकत नाही आणि याचे तिला खूप दुःख आहे. दिपालीच्या आईची ही हृदय पिळवटून टाकणारी कथा ऐकल्यानंतर आणि दिपालीचे उत्तम अभिनय कौशल्य पाहिल्यानंतर मेंटॉर ओमंग कुमार हे मंचावर आले आणि त्यांनी जाहीर केले की ते आपल्या पुढील चित्रपटामध्ये दिपालीला निश्चितपणे काम देतील आणि त्यासाठी त्यांनी दिपालीला तिथल्या तिथे सायनिंग अमाऊंटही प्रदान केली. एक वर्ष त्यांच्या घराचे भाडे भरण्याचीही त्यांनी तयारी दाखवली. मग मेंटॉर विवेक आनंद ओबेरॉयही त्यात सामिल झाले आणि म्हणाले, “आम्ही इंडियाज् बेस्ट ड्रामेबाझचा परिवार आहोत आणि एखाद्या परिवाराप्रमाणेच एकमेकांना मदत करतो. मी तुझ्या बहिणीच्या वैद्यकिय अभ्यासाचा खर्च उचलीन आणि तिला तिचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेन.”