India's Got Latent Controversy: युट्यूबर रणवीर अलाहाबादिया त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये रणवीरने पालकांच्या पर्सनल आयुष्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं होतं. शोमधील त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र याबरोबरच रणवीरला आणखी एक मोठा झटका बसला आहे.
रणवीरने पालकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर त्याच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे चाहते दुखावले असून अनेकांनी त्याला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे. इन्फ्लुएन्सर मार्केंटिंग इंटेलिजेंस प्लॅटफॉर्मच्या रिपोर्टनुसार रणवीर अलाहाबादियाचे इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्स कमी होत आहेत.
रणवीरचे इन्स्टाग्रामवर रणवीर अलाहाबादिया आणि बिअर बायसेप्स असे दोन अकाऊंट आहेत. युट्यूबरच्या या वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादिया या अकाऊंटचे ४ हजार १५३ फॉलोवर्स कमी झाले आहेत. तर बिअर बायसेप्स या अकाऊंटलाही ४ हजार २०५ लोकांनी अनफॉलो केलं आहे. रणवीरच्या पॉडकास्टवरही याचा परिणाम होणार असल्याचं दिसत आहे. बॉलिवूड गायक बी प्राकने युट्यूबरच्या पॉडकास्टमध्ये येण्यास नकार दिला आहे.
रणवीर अलाहाबादियाने मागितली माफी!
"माझे विधान केवळ अयोग्यच नव्हते तर ते मजेदारही नव्हते. कॉमेडी ही माझी खासियत नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे. जे घडले त्यामागे मी कोणताही संदर्भ किंवा तर्क देणार नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. वैयक्तिकरित्या माझ्याकडून निर्णय घेण्यात चूक झाली. पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक ऐकतात. त्यामुळे ही जबाबदारी हलक्यात घेईल अशी व्यक्ती मला व्हायचं नाही. कुटुंब ही शेवटची गोष्ट आहे ज्याचा मला कधीही अनादर करायचा नाही. मला या प्लॅटफॉर्मचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्याची गरज आहे, या संपूर्ण अनुभवातून मी हेच शिकलो आहे. मी आणखी चांगले होण्याचे वचन देतो. मी व्हिडिओच्या निर्मात्यांना व्हिडिओमधून असंवेदनशील भाग काढून टाकण्यास सांगितले आहे आणि शेवटी मी एवढेच म्हणू शकतो की मला माफ करा, मला आशा आहे की तुम्ही एक माणूस म्हणून मला माफ कराल".