Join us  

'इंद्रायणी' मालिकेतील इंदुचा कीर्तनकार म्हणून प्रवास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:04 AM

Indrayani Serial : 'इंद्रायणी' मालिकेत आनंदीने गोपाळचं कीर्तन उधळण्याचा डाव रचल्याचं पाहायला मिळतंय. पण इंदू मात्र विठुच्या वाडीची शान राखणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील 'इंद्रायणी' (Indrayani Serial) ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कथा, विषय, सादरीकरण आणि कलाकारांच्या अभिनयाच्या जोरावर ही मालिका लोकप्रिय ठरते आहे. मालिकेत सध्या आषाढी एकादशी विशेष भाग पार पडताना दिसत आहे. विठू पंढरपूरकरचं पुन्हा आगमन झाल्यामुळे यंदाच्या आषाढीला इंदूची इच्छा पू्र्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे. 

'इंद्रायणी' मालिकेत आनंदीने गोपाळचं कीर्तन उधळण्याचा डाव रचल्याचं पाहायला मिळतंय. पण इंदू मात्र विठुच्या वाडीची शान राखणार आहे. मालिकेच्या आगामी भागात इंदूचा कीर्तनकार म्हणून सुरू झालेला प्रवास पाहायला मिळेल. इंदूने नकळत अभंगातला भक्तिभाव शिकला आहे. गोपाळने पत्त्यांचा ध्यास घेतलाय. अशावेळी इंदुचा कीर्तनकार म्हणून सुरू असलेला एकलव्य प्रवास कामी येणार आहे.

आषाढी एकादशी विशेष भागाच्या प्रोमोनुसार सर्व गावकरी गोपाळचं कीर्तन ऐकायला जमले आहेत. पण गोपाळ मात्र गावाबाहेर पळून गेलाय. अशावेळी व्यंकू महाराज कीर्तन म्हणण्याचा प्रयत्न करतात. पण वाचा गेल्याने त्यांना शब्द फुटत नाहीत. अशावेळी कीर्तनकाराच्या रुपात 'बोला पुंडलिकावरदा हरि विठ्ठल' म्हणत इंदू अवतरते आणि कीर्तनाला सुरुवात करते. इंदूचा कीर्तनकार म्हणून सुरू झालेला प्रवास पाहून गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

डोक्यावर फेटा, धोतर, कुर्ता, जॅकेट, खांद्यावर पंचा, गळ्यात तुळशीची माळ अशा लूकमध्ये कीर्तनकार 'इंद्रायणी' पाहायला मिळत आहे. इंद्रायणीच्या कीर्तनामुळे व्यंकू महाराजांचाही आवाज परत येणार आहे. त्यामुळे मालिकेचे आगामी भाग अधिक रंजक असतील. 

टॅग्स :कलर्स मराठी