'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील स्त्री पात्राच्या कपड्यांवर गौतम बुद्धांचं चित्र दाखवल्याप्रकरणी मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या भागामध्ये सँडी या स्त्री पात्राने परिधान केलेल्या ब्लाऊजवर गौतम बुद्धांचे चित्र छापण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी भावना दुखावल्याचा आरोप करत मालिकेवर टीका केली होती. त्यानंतर महेश कोठारे यांनी माफी मागितली आहे.
"१४ सप्टेंबर रोजी झालेल्या भागात आमच्याकडून जी चूक घडली आहे. त्याबद्दल मी,मालिकेची संपूर्ण टीम, यातील कलाकार आणि तंत्रज्ञ या सर्वांच्या वतीने मी जाहीरपणे तुमची माफी मागतो. यापुढे आमच्याकडून अशी प्रकारची कोणतीही चूक होणार नाही याचं मी आश्वस्त करतो", असं महेश कोठारे म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "वंदनीय गौतम बुद्ध हे आम्हाला कायमच आदरणीय आहेत त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा आमचा मुळीच हेतू नव्हता. जाणूनबुजून आम्ही कोणीही ही चूक केलेली नाही. त्यामुळे तुमच्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो. आणि, तुम्ही सुद्धा मला माफ कराल अशी आशा व्यक्त करतो."
दरम्यान, 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील जयदीप आणि गौरी यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडत आहे. त्यामुळेच ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत यशस्वीपणे वाटचाल करतांना दिसत आहे. मात्र, १४ सप्टेंबर रोजी दाखवण्यात आलेल्या भागामुळे अनेकांनी या मालिकेवर टीकास्त्र डागलं आहे.