छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत येणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी (bigg boss marathi). आतापर्यंत या शोचे चार पर्व पार पडले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक पर्वातील कलाकारांनी हा कार्यक्रम दणाणून सोडला. यात काही स्पर्धकांनी हा शो सोडल्यावर कार्यक्रमावर टीका केली. तर, काहींनी कौतुकाचा पाढा वाचला. त्यामुळे या शोविषयी नेटकऱ्यांमध्ये अनेक गोष्टींची चर्चा रंगते. यात खासकरुन हा शो स्क्रिप्टेड आहे की नाही? ही चर्चा तर गेल्या कित्येक वर्षांपासून रंगत आहे. या प्रश्नाचं उत्तर अभिनेता किरण माने (kiran mane) यांनी दिलं आहे.
'मुलगी झाली हो' या मालिकेतून घराघरात पोहोचलेले किरण मानेबिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात झळकले होते. या पर्वात त्यांनी टॉप ३ मध्ये जागा मिळवली होती. अलिकडेच त्यांनी मित्र म्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड आहे की नाही याचं उत्तर दिलं.
"मी बाहेरुन बिग बॉस बघायचो. त्यात ते एकमेकांवर आरोप करायचे. मला प्रश्न पडायचा हे खरंच असं असेल का? मला पैशाची गरज तर होतीच. पण, मी गावी शेती करुनही स्वत:चा उदरनिर्वाह करु शकलो असतो. मात्र, स्वत:ला पारखून पाहायचं होतं. जसं लोक म्हणताता तसाच मी खरंच वागतोय का, मी स्वत:ला खरंच दीड शहाणा समजतोय का? मी माणूस म्हणून खोटं वागतोय का, मी उगाचच उद्धटपणा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला तिकडे गेल्यावर मिळणार होती", असं किरण माने म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का? असं बऱ्याचदा विचारलं जातं. पण, अजिबात नाही. शक्यच नाहीये ते. मालिकांसाठी चॅनेलचे, प्रोडक्शन हाऊसचा माणूस, लेखक अशा लोकांची मिटिंग होते आणि मग आठवड्याभराचे एपिसोड ठरतात. त्यामुळे हा शो स्क्रिप्टेड अजिबात नाही.इथे ते करणं मुळीच शक्य नाहीये. तसंच तिथे येणारे काय सगळेच कलाकार नसतात जे हातात स्क्रिप्ट दिली आणि लगेच सुरु झाले. बिग बॉस मुळीच स्क्रिप्टेड नसतं. तिथे जी भांडणं होतात तीही खरी असतात. प्रत्येक जण आपापला गेम खेळत असतो.''दरम्यान, किरण माने त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठीही चर्चेत येत असतात. लवकरच ते सिंधूताई सकपाळ यांच्या जीवनावर आधारित एका मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.