सध्या कलाविश्वात लगीनघाई सुरू आहे. एका मागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. २०२४ वर्ष संपताना अनेक सेलिब्रिटींनी लग्नबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. तर २०२५च्या सुरुवातीलाही काही कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत. रेश्मा शिंदे, हेमल इंगळे, शिवानी सोनार यांच्यानंतर अभिनेत्री समृद्धी केळकरही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
'फुलाला सुगंध मातीचा' फेम अभिनेत्री समृद्धी लग्नाच्या बेडीत अडकणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या चर्चांना कारणही अभिनेत्रीची एक पोस्ट ठरली आहे. समृद्धीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातावर मेहेंदी आणि नव्या नवरीसारखा हिरवा चुडा भरल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत समृद्धीने "कळवते लवकरच..." असं कॅप्शन देत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. त्यामुळे समृद्धीचंही ठरलं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
समृद्धीच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. "काय आहे नक्का?", "क्या बात है", "चला तर मग", "लग्न ठरलंय सांगू नको" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. काहींनी समृद्धीचं अभिनंदनही केलं आहे. समृद्धीचा हा नवा प्रोजेक्ट आहे की खरंच ती लग्न करतेय, या प्रश्नाचं उत्तर मात्र चाहत्यांना मिळालेलं नाही.
दरम्यान, समृद्धी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. काही मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'लक्ष्मी सदैव मंगलम' मालिकेत ती दिसली होती. तर 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 'मी होणार सुपरस्टार' या शोचं तिने सूत्रसंचालनही केलं होतं.