Join us

​तिहेरी तलाकवर भाष्य करणार इश्क सुभान अल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 7:53 AM

निकाहसाठी मुलीची मंजुरी आवश्यक असेल, तर केवळ तीनदा “तलाक… तलाक…. तलाक” असे शब्द उच्चारून हे विवाहबंधन तोडण्याची एकतर्फी सवलत ...

निकाहसाठी मुलीची मंजुरी आवश्यक असेल, तर केवळ तीनदा “तलाक… तलाक…. तलाक” असे शब्द उच्चारून हे विवाहबंधन तोडण्याची एकतर्फी सवलत पुरुषाला कशी काय मिळू शकते? त्यात तिचे मतही विचारात घ्यायला नको का? विवाहाच्या पवित्र बंधनात आपल्या पत्नीच्या संमतीनंतरच लग्नबंधनात बांधला जाणारा पुरुष हे बंधन केवळ त्याच्या मर्जीनुसार एकतर्फी कसे तोडू शकतो, यासारखे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. विशेषत: ज्या देशात लिंगभेद दूर होत असून स्त्री-पुरुषांना समान अधिकार मिळत आहेत, अशा देशात असे प्रश्न विशेषत्त्वाने उपस्थित होत आहेत. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर संसदेच्या निकालाची प्रतीक्षा होत असून या विषयावर सध्या समाजात सार्वत्रिक चर्चा होत असताना झी वाहिनीने आपल्या ‘इश्क सुभान अल्ला’ या नव्या मालिकेतून कबीर आणि झारा यांच्यातील कथेद्वारे तिहेरी तलाकच्या समस्येला हात घातला आहे. या मालिकेचे कथानक लखनऊमध्ये घडते. कबीर आणि झारा हे एक मुस्लिम दाम्पत्य असून ते पवित्र कुराणाचा अर्थ नव्या पद्धतीने लावतात. कबीर हा मौलवी असून तो शरियातील शिकवणुकीनुसार कुराणाचा पारंपरिक आणि नैतिक अर्थ सांगत असतो. तर झारा ही आधुनिक शिक्षण घेतलेली तरूण मुलगी कुराणातील शिकवणुकीचा तार्किक आणि व्यवहाराच्या कसोटीवर अर्थ लावत असते. महिलांचे सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता, आधुनिक जीवनशैली, न्याय आणि समानता या निकषांवर ती शरियातील शिकवणुकीचा अर्थ लावते. कुराणात तिहेरी तलाकचा उल्लेखच नसल्याने तसा तलाक देणे हे मुळातच इस्लामविरोधी आहे, असे झाराचे मत असते. तिच्या मते, तलाक हा ६० दिवसांनंतर दिला गेला पाहिजे, म्हणजे पती-पत्नींना तडजोड किंवा सलोखा करण्यास पुरेशी संधी मिळेल. नियती या दोघांना लग्नाच्या बंधनात अडकवते खरी; पण नंतर त्यांच्या दृष्टिकोनांतील मतभेदांचा संघर्ष उडतो, तेव्हा त्यांचे वैवाहिक जीवन तलाकच्या दिशेने वेगाने धावू लागते. त्यांच्या आयुष्यात पुढे काय होते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘इश्क सुभान अल्ला’ या मालिकेत आत्मविश्वासू आणि स्वतंत्र विचारांच्या झारा या नायिकेची भूमिका आयशा सिंह रंगवणार असून तिच्या पतीची भूमिका अदनान खान साकारणार आहे. याविषयी आयशा सिंह सांगते, “या मालिकेची संकल्पना अगदी वेगळी असून या मालिकेद्वारे आम्ही एक संदेश प्रेक्षकांना देत आहोत. झारा ही एक स्वतंत्र विचारांची मुलगी असून तिने घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांना ती घाबरत नाही. ती स्वत: पवित्र कुराणातील शिकवणुकीचे पालन करते, परंतु ते करताना ती तिचे अंधानुकरण करत नाही. त्यातील शिकवणीचा आजच्या काळातील संदर्भ ती लक्षात घेते आणि त्यानुसार ती तर्कसंगत आणि विवेकबुद्धीने त्यातील शिकवण अंमलात आणते.” अभिनेता अदनान खान सांगतो, “मी या मालिकेत इस्लामचे सखोल ज्ञान असलेल्या तरूण मौलवीच्या भूमिकेत आहे. तो परंपरा आणि संस्कृतीप्रिय असला, तरी त्याचे व्यक्तिमत्त्व आणि दृष्टिकोन हा हे झाराच्या परस्परविरोधी आहे. मी स्वत: मुस्लीम असल्याने मला कबीरची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. खरं तर मी वैयक्तिक जीवनात अतिशय धार्मिक मनोवृत्तीचा असलो, तरी मी आधुनिक नजरेने त्याकडे पाहतो. त्यामुळेच मला कबीरचा धर्माच्या बाबतीत नेमका काय दृष्टिकोन आहे, ते अचूक उमगलं.”