देवीयों और सज्जनों हे शब्द पुन्हा एकदा कानावर पडणार आहेत, पुन्हा एकदा रंगणार प्रश्नांचा रंगमंच, पुन्हा उलगडणार अनेकांचं भावनिक विश्व, पुन्हा रंगणार गप्पांची मैफल आणि पुन्हा कुणी तरी सामान्यातील सामान्य बनणार करोडपती. कारण आजपासून कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसीचं नवं पर्व रसिकांच्या भेटीला आले आहे. आजपासून या सिझन १३ ची सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवासंपासून शोचे प्रोमोही टीव्हीवर झळकत आहेत.
या शोमध्ये यंदा काही बदलही करण्यात आले आहेत. 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' हे 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट - ट्रिपल टेस्ट' असे करण्यात आले आहे, ज्यामध्ये स्पर्धकाला तीन योग्य उत्तरे द्यावी लागतील. 'ऑडियन्स पोल'च्या लाईफलाईन हा ऑप्शन यंदाही असणार आहे. सोनी टीव्हीवर आज रात्री 9 वाजता हा शो रसिकांना पाहाता येणार आहे.शोमध्ये पुन्हा एकदा स्पर्धकांकडून अनेक प्रेरणादायी अनुभवही ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळेच कौन बनेगा करोडपती अनेक अर्थानं प्रेक्षकांचं मनोरंजनही करेल आणि ज्ञानही वाढवणार यात शंका नाही.
प्रत्येक व्यक्ती जीवनात यशस्वी होण्याचं स्वप्न पाहत असतो. आपल्या जीवनातील स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो. मात्र प्रत्येकालाच त्याची स्वप्नं पूर्ण करता येतात असं नाही. मोजक्या मंडळींची स्वप्न साकार होतात. मात्र अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी.
महानायक आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव केबीसीशी नाव जोडलं गेलं. त्यामुळे या केबीसीला एक परिमाण लाभलं होतं. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.