Join us

‘सा रे ग म प’ची विजेती ठरली जबलपूरची इशिता विश्वकर्मा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 3:41 PM

या अंतिम फेरीत प्रचंड जल्लोषात जबलपूरची स्पर्धक इशिता विश्वकर्मा हिची या स्पर्धेची विजेती म्हणून निवड करण्यात आली. इशिताला ट्रॉफी आणि पाच लाख रुपयांचे बक्षीस करण्यात आले.

ठळक मुद्देइशिताला ट्रॉफी आणि पाच लाख रुपयांचे बक्षीस करण्यात आले.

मनोरंजन करीत असलेल्या ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमाची या वीकेण्डला अंतिम फेरी पार पडली. या अंतिम फेरीत प्रचंड जल्लोषात जबलपूरची स्पर्धक इशिता विश्वकर्मा हिची या स्पर्धेची विजेती म्हणून निवड करण्यात आली. इशिताला ट्रॉफी आणि पाच लाख रुपयांचे बक्षीस करण्यात आले. तन्मय चतुर्वेदी आणि सोनू गिल या अंतिम फेरीतील दोन स्पर्धकांची अनुक्रमे पहिला आणि दुसरा उपविजेता म्हणून निवड करण्यात आली.

इशिता म्हणाली, ''‘सा रे ग म प’ या स्पर्धेत मलाखूप काही शिकायला मिळालं आहे. इतक्या महान आणि गुणी परीक्षकांचं मार्गदशन मला लाभलं, याबद्दल मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजते. या संपूर्ण स्पर्धेत मला गाण्याच्या विविध शैली आजमावता आल्या आणि त्यांनी माझ्या गायकीत चांगली सुधारणा झाली. या स्पर्धेशी संबंधित सर्वजण, म्हणजे परीक्षक, ज्यूरी, सूत्रसंचालक आणि माझे प्रतिस्पर्धी या सर्वांनी मला खूपच मदत केली आणि प्रोत्साहनही दिलं. ‘सा रे ग म प’सारख्या अतिशय प्रतिष्ठेच्या आणि सर्वात मोठ्या गायनविषयक व्यासपिठावर मला माझी कला सर्वांपुढे सादर करता आली, याचा मला विशेष आनंद होत आहे. या स्पर्धेदरम्यान माझी मैत्री काहीजणांशी जुळली असून ती मी आयुष्यभर कायम ठेवीन. मला ही अप्रतिम संधी दिल्याबद्दल मी झी टीव्ही वाहिनीचीही आभारी आहे.”

स्पर्धेच्या अंतिम फेरीचा प्रारंभ इशिता विश्वकर्मा, सोनू गिल, तन्मय चतुर्वेदी, साहिल सोळंकी, ऐश्वर्या पंडित आणि अस्लम अब्दुल मजीद या सहा अंतिम स्पर्धकांच्या जबरदस्त गाण्यांनी झाला. पार्श्वगायिका सुनिधी चौहान हिने सर्व सहाही अंतिम स्पर्धकांबरोबर आपली दिल्लीवाली गर्लफ्रेंड, पर्दा पर्दा व मैं बढिया तूभी बढिया ही लोकप्रिय गाणी गायली. ‘मणिकर्णिका’च्या प्रमोशनसाठी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणौत आणि अंकिता लोखंडे याही या अंतिम फेरीत सहभागी झाल्या होत्या. या चित्रपटात झलकारीबाईची भूमिका रंगविलेल्या अंकिता लोखंडेने ‘विजयी भव’ हे गाणे गायले, तेव्हा सर्वजण भारावून गेले. कंगनाने स्पर्धकांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :सा रे ग म प