Join us

खंडेरायाचे भक्त जगभर, थायलंडमध्ये प्रसारीत होणार 'जय मल्हार' मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 10:23 AM

थायलंडमध्येही  ‘Zee Nung’ या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. ‘हे अत्यंत अभिमानाचे क्षण आहेत,’ असं देवदत्तनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

छोट्या पडद्यावर जय मल्हार ही मालिका तुफान गाजली होती.मालिकेतील सर्वच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले होते. देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि इशा केसकर या तीनही कलाकारांना या मालिकेनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून उदंड प्रेम मिळवून दिलं. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी  ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरात लोकप्रिय ठरली होती. आता ही मालिका थायलंडमध्येही प्रसारित होणार त्याचा प्रोमोसुद्धा प्रदर्शित झाला आहे. खुद्द अभिनेता देवदत्त नागेनेही ही बातमी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. जय मल्हार मालिकेत खंडेरायची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेवर रसिकांनी भरभरुन प्रेम केलं. त्याच्या या भूमिकेमुळे तो जणू काही खरोखरच देव आहे अशाही काही प्रतिक्रिया त्याच्या फॅन्सनी व्यक्त केल्या होत्या.आता थायलंडमध्येही ''यळकोट... यळकोट, यळकोट जयमल्हार'' असा आवाज दुमदुमनार आहे. ‘Zee Nung’ या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. ‘हे अत्यंत अभिमानाचे क्षण आहेत,’ असं देवदत्तनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

अगड दुम नगारा, सोन्याची जेजुरी... हे शीर्षकगीत लागले की संध्याकाळी ७ वाजले की  घरातील सगळीच मंडळी टीव्हीसमोर येऊन बसत.राजा आणि त्याच्या दोन राण्या यांची कथा रंगल्यामुळे या मालिकेची लोकप्रियता वाढत गेली आणि अनपेक्षितरित्या ही मालिका तीन वर्षे रंगली.खंडेराय, म्हाळसा आणि बाणाई यांचा कैलासावर जाण्याचा प्रसंग या मालिकेचा अखेरचा भाग ठरला.ही मालिका संपून बराच कालावधी झाला असला तरीही आजही मालिकेचे कलाकार दिसताच चाहते त्यांच्यासोबत  जय मल्हारच्या आठवणीमध्ये रमताना दिसतात.  आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून व्हीएफएक्स पद्धतीने या कथानकाला अधिक भव्यता मिळवून देणारी ही मराठीतील पहिली मालिका ठरली होती. महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली होती. 

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत जय मल्हार या पौराणिक मालिकेचे नाव घेतले जाते.18 मे 2014 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. या मालिकेने यशस्वी 900 भाग पूर्ण करत 942 भागाचा टप्पा गाठत 15 एप्रिल 2017 ला  रसिकांचा निरोप घेतला होता. महाराष्ट्राचे आराध्यदैवत खंडेरायांच्या कथांवर आधारित आणि तुफान लोकप्रिय ठरलेली ‘जय मल्हार’ मालिका आता थायलंडमध्ये सुरू होणार हे नक्कीच अभिमानास्पद आहे.

टॅग्स :देवदत्त नागे