जम्मू-काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि अभिनेता शोएब इब्राहिम त्यांच्या दोन वर्षांच्या मुलासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अभिनेत्रीने ते सुखरुप असल्याचं म्हटलं आहे.
दीपिका आणि शोएब काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये गेले होते. याचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी शेअर केले होते. पण, सुदैवाने हल्ला होण्याच्या दिवशीच सकाळी ते दिल्लीला परतले होते. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दीपिकाने स्टोरी शेअर करत याबाबत अपडेट दिली आहे. "तुम्हाला सगळ्यांना आमची चिंता होत होती. पण, आम्ही सुरक्षित आहोत. ठीक आहोत. आज सकाळीच आम्ही काश्मीरवरून परतलो होतो आणि दिल्लीला सुरक्षित पोहोचलो. तुमच्या आशीर्वादासाठी धन्यवाद", असं तिने म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला झाला तेव्हा दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. हल्लेखोर दहशतवादी ८ ते १०च्या संख्येतील असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दहशतवाद्यांनी ४० पर्यटकांना घेरुन आधी त्यांची नावे विचारली आणि विशिष्ट धर्मीय नावे असलेल्या पर्यटकांना गोळ्या घातल्या, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यात नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला.