Join us  

जानकी पाठक आणि साईंकित कामत यांची मालिका 'माझी माणसं' मनोरंजक वळणावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 2:48 PM

Mazi Mansa: 'माझी माणसं' ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वतःच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका कर्तृत्ववान मुलीची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

‘आपल्या हक्काची माणसं ही खरंच आपली असतात का?' ह्या प्रश्नाभोवती फिरणारी सन मराठी या वहिनीवरील 'माझी माणसं' (Mazi Mansa) ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वतःच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका कर्तृत्ववान मुलीची गोष्ट या कलाकृतीच्या निमित्ताने प्रेक्षक अनुभवत आहेत. या मालिकेमध्ये जानकी पाठक (Janki Pathak) आणि  साईंकित कामत (Sainkit Kamat) यांच्याबरोबर स्मिता सरवदे, दिगंबर नाईक यांचीदेखील प्रमुख भूमिका असून  ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.

आपल्या काकांनी रचलेल्या कारस्थानांविरोधात खंबीरपणे उभं राहून आपलं संपूर्ण घर सांभाळणारी 'गिरीजा' येणाऱ्या संकटांना धीराने आणि ताकदीने तोंड देत आहे. त्यामुळे मालिकेने आता चांगलाच वेग घेतला असून, परिस्थितीशी झगडत असलेल्या गिरीजाला आपल्याच माणसांच्या विरोधात जाऊन परिस्थिला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे गिरीजाला  कौटुंबिक आयुष्यात काकांकडून होणाऱ्या जाचाला सामोरं जावं लागत आहे तर दुसरीकडे हेड नर्स असलेल्या गिरीजाला हॉस्पिटलमध्येसुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. गिरीजा हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मनापासून शुश्रूषा करत असताना देखील तिला विविध प्रकारे त्रास देऊन तिचे खच्चीकरण करणे हा हेतू असलेल्या डॉक्टर जयंतच्या रूपात गिरिजापुढे एक नवं संकट उभं ठाकलं आहे.

एक दिवस गिरीजा एका गाडीला आग लागलेली पाहते आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या जळत्या गाडीमध्ये अडकलेल्या लहान मुलीचे प्राण वाचवते. या चांगल्या कामगिरी बद्दल गिरिजाला  'जबाबदार नागरिक' हा पुरस्कार जाहीर होणे हे तिच्या काकांना काही आवडत नाही. तेव्हा ते पुढे आता काय करणार? हा पुरस्कार गिरिजाला मिळणार की नाही? हे पाहणे रंजक ठरणार आहे .