९० चा काळ गाजवणारी लोकप्रिय मालिका म्हणजे श्रीमान श्रीमती. या मालिकेने छोटा पडदा चांगलाच गाजवला. १९९४ साली गाजलेल्या या मालिकेतील केशव कुलकर्णी ही भूमिका विशेष गाजली. उत्तम अभिनयशैली, विनोदाचं अचूक टायमिंग यामुळे ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली. परंतु, ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं फार कमी वयात निधन झालं. परंतु, आजही ते त्यांच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये जिवंत आहेत.
'श्रीमान श्रीमती' या मालिकेत जतीन कनकिया यांनी केशव कुलकर्णी ही भूमिका साकारली होती. दूरदर्शनवरील त्यांची ही पहिलीच मालिका होती. ही मालिका जवळपास ३ वर्ष चालली. परंतु, जतीन कनकिया यांनी कायमस्वरुपी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. दिलखुलास व्यक्तीमत्त्व असलेल्या जतीन यांनी १९९७ ते १९९९ या काळात काही गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केलं. त्यात 'विश्वविधाता', 'खूबसूरत', 'हम साथ साथ हैं' आणि 'त्रिशक्ति' हे त्यांचे सिनेमा गाजले. त्यानंतर ते येस बॉस या कॉमेडी शोमध्येही झळकले.
कसं झालं जतीन यांचं निधन?
प्रेक्षकांना हसवणाऱ्या या अभिनेत्याचं कर्करोगामुळे निधन झालं. जतीन यांना वरचेवर पोटदुखीचा त्रास व्हायचा. नंतर नंतर हा त्रास प्रचंड वाढू लागला. तसंच पोटदुखीशी संबंधित अन्य समस्याही उद्भवू लागल्या. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी काही चाचण्या केल्या. ज्यात त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. परंतु, अनेक उपचार करुनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. या आजारपणामध्येच त्यांचं निधन झालं.