Join us

दत्तक घेतलेल्या मुलांना जय माहीने सोडले का ? नेटीझन्सच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 7:35 PM

उगाच अफवा पसरवू नका. खुशी आणि राजवीर यांना केवळ त्यांच्या आई-वडिलांचेच नाही तर आम्ही दोघेही त्यांच्या आई-वडिलांसारखेच आहोत. त्यांना दोन घरं आहेत. जेव्हा त्यांना वाटेल ते आम्हाला भेटायला येऊ शकतात.

टीव्ही अभिनेता जय भानुशाली आणि माही विज या कपलने राजवीर आणि खुशी या दोन मुलांना दत्तक घेतले होते. स्वतःचे मुलं होत नाही तोपर्यंत दोघांनीही दत्तक घेतलेल्या मुलांचा सांभाळ केला. दोन्ही मुलं या दोघांकडेच राहत होते. जय माही दोघेही मुलांसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसायचे. मात्र २०१९ मध्ये या कपलच्या आयुष्यात स्वतःच्या बाळाचे आगमन झाले. मुलीचे नाव तारा भानुशाली असे आहे. 

जय आणि माही दोघेही तारामध्ये बिझी झाले आणि कुठेतरी दत्तक घेतलेल्या मुलांवरुन त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले गेले. राजवीर आणि खुशी बरोबर वेळ घालवणारे कपलने ताराच्या जन्मानंतर दत्तक मुलांबरोबर वेळ घालवणेही बंद केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. इतकेच काय तर लॉकडाऊनमध्ये दोघांनीही राजवीर आणि खुशीला त्यांच्या गावी पाठवून दिले. पुन्हा त्यांना आणलेच नाही. त्यामुळे आता जय आणि माहीला पुन्हा एकदा चाहत्यांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला आहे. यावर माही भानुशालीने सोशल मीडियावर दत्तक मुलांवर उत्तर दिले आहे. 

राजवीर आणि खुशी यांच्याबद्दल माहीनने सांगितले की, 'मुळात या दोघांना आम्ही दत्तक घेतलेले नाही. दोघांचे आई वडिल आमच्याच बरोबर राहत होते. राजवीर आणि खुशी त्यांचा जन्म झाल्यापासून आमच्यासोबतच राहत असल्यामुळे मला आणि जयला दोघेही आई - बाबाच बोलवायचे.आम्ही सर्वजण एका आनंदी कुटुंबाप्रमाणे एकत्र राहत होतो.राजवीर आणि खुशीला आम्ही दत्तक घेतल्याचे माहिती चुकीची आहे. आम्ही दोघांनाही दत्तक घेतले नाही.

कोरोनामुळे सध्या सगळेच त्यांच्या गावी गेले आहेत. मुलांनी गावी राहणे जास्त सुरक्षित असल्याचे त्यांच्या पालकांचे मत होते. त्यामुळे मुलं सध्या त्यांच्या पालकांबरोबर गावी राहत आहेत. मुलं आमच्याबरोबर दिसत नसल्यामुळे कदाचित नेटीझन्सना असे प्रश्न पडत असावे असेही माहीने म्हटले आहे.

यावर मध्यंतरी जय भानुशालीनेही नेटीझन्सना उत्तर देत म्हटले होते की, उगाच अफवा पसरवू नका. खुशी आणि राजवीर यांना केवळ त्यांच्या आई-वडिलांचेच नाही तर आम्ही दोघेही त्यांच्या आई-वडिलांसारखेच आहोत. त्यांना दोन घरं आहेत. जेव्हा त्यांना वाटेल ते आम्हाला भेटायला येऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून आम्ही दूर झालेलो नाही.

टॅग्स :जय भानुशाली