Join us

'जीव माझा गुंतला' फेम अंतरा-मल्हारने खऱ्या आयुष्यातही बांधली लग्नगाठ, शेअर केले Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 15:19 IST

Yogita chavan: योगिता चव्हाणने बांधली लग्नगाठ; 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्यासोबत घेतलं सात जन्माचं वचन

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. एका पाठोपाठ एक अनेक लोकप्रिय कलाकार लग्नगाठ बांधत आहेत. नुकतंच लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत (pooja sawant) हिने सिद्धेश चव्हाण (siddhesh chavan) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. तिच्याच पाठोपाठ आता छोट्या पडद्यावर लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण (yogita chavan)  सुद्धा लग्नाच्या बेडीत बांधली गेली आहे. योगिताने 'जीव माझा गुंतला' फेम लोकप्रिय अभिनेत्यासोबत लग्न केलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण हिने नुकतीच अभिनेता सौरभ चौघुले याच्यासोबत लग्न केलं आहे. योगिताने इन्स्टाग्रामवर  लग्नातील फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विशेष म्हणजे अत्यंत साध्या पद्धतीने योगिता आणि सौरभने लग्नगाठ बांधली असून सध्या त्यांच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“३ मार्च २०२४… आयुष्यभराचा हमसफर” असं कॅप्शन देत योगिताने तिच्या लग्नातला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सौरभ तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालत आहे. अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या या विवाहसोहळ्यात योगिताने लाल रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर पारंपरिक दागदागिने परिधान केले होते. कर, सौरभने पांढऱ्या रंगाचा सदरा आणि त्यावर वेलव्हेटची हिरव्या रंगाची शाल घेतली होती.

योगिता आणि सौरभ या जोडीने 'जीव माझा गुंतला' या मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर केली होती. मालिकेतील अंतरा आणि मल्हार यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. विशेष म्हणजे या रिल लाइफ जोडीने रिअल लाइफमध्ये लग्न करत चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकारमराठी अभिनेतापूजा सावंत