टीव्ही मालिकांमध्ये अनेकदा तुम्ही लहान मुलांनाही पाहिलं असेल. मालिकेत नुकतंच जन्मलेलं बाळ दाखवण्यासाठीही आजकाल खरंखुरं नवजात बाळ घेतलं जातं. पण, असं करणं एका हिंदी मालिकेच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये या बाळाला रंग लावला जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
झनक ही हिंदी मालिका टीआरपीच्या शर्यतीत असते. या मालिकेत हिबा नवाब झनक, कृशाल अहुजा अनिरुद्ध आणि चांदनी शर्मा अर्शीच्या भूमिकेत आहेत. सध्या मालिकेत अर्शी अनिरुद्धच्या मुलाची आई होणार असल्याचं दाखविण्यात येत आहे. अर्शीचा अपघात होतो आणि नंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. तिथेच ती तिच्या मुलाला जन्म देते. याचा BTS व्हिडिओ अभिनेत्रीने सेटवरुन शेअर केला आहे. पण, या व्हिडिओत नवजात बाळ दिसत आहे. ज्याच्या शरीराला लाल रंग लावत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मालिकेच्या सेटवरचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्यापद्धतीने बाळाला पकडलं आहे, ते पाहून प्रेक्षकही भडकले आहेत. शिवाय केमिकलचा रंग बाळाच्या शरीरावर लावला जात असल्याचं पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. "किती निष्काळजीपणाने बाळाला पकडलं आहे. त्याच्या अंगावर केमिकल लावलं जात आहे", "ते बाळ खरं आहे की नाही ते माहीत नाही. मला आशा आहे की ते खरं नसावं", "यांच्यावर कारवाई झाली पाहिजे", अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.